देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी कडेगाव येथे जाहीर सभा संजयकाका पाटील यांच्या प्रचाराला पलूस- कडेगावमध्ये वेग
प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि.२५ : सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या निवडणूक प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी (दिनांक २७ एप्रिल) रोजी कडेगाव येथील स्व. सुरेशबाबा देशमूख चौक येथे दुपारी १ वाजता जाहीर सभा होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच पलूस -कडेगाव विधानसभा मतदार संघ क्षेत्राचे प्रमुख संग्रामसिंह देशमुख या सभेची जय्यत तयारी करीत आहेत. त्यासाठी गावोगाव कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत.
पलूस -कडेगाव विधानसभा मतदारसंघात मा. आ. पृथ्वीराजबाबा देशमुख व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच पलूस -कडेगाव विधानसभा मतदार संघ क्षेत्राचे प्रमुख संग्रामसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व कार्यकर्ते समर्थक संजयकाका पाटील यांच्या प्रचारात आघाडीवर आहेत. पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यात त्यांनी प्रचाराचा झंजावात उठवला आहे. शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाल्यावर या प्रचाराला आणखीनच गती येणार आहे.
सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात बारमाही पाणी मिळाले पाहिजे, तेथील शेती बागायती झाली पाहिजे, शेतकऱ्यांना समृद्धी आली पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची संपूर्ण देशात ओळख आहे. सांगली जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू , आरफळ अशा सर्व योजनांसाठी खासदार संजयकाका पाटील यांनी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणावर निधी आणला आणि या सर्व योजनांना गती दिली. त्यामुळे दुष्काळग्रस्त कडेगाव, खानापूर, आटपाडी, जत, कवठेमंकाळ, तासगाव, मिरज पूर्व भाग येथे पाणी पोहोचले. त्यासाठी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने मदत केली.
माजी आमदार स्व. संपतराव देशमुख यांनी टेंभू योजनेच्या मंजुरीसह दुष्काळग्रस्त कडेगाव, खानापूर, आटपाडी अशा सर्व तालुक्यांसाठी सातत्याने पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्याच विचारांचा आणि कार्याचा वारसा घेऊन पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख हे काम करत आहेत. संजयकाका पाटील यांनी पाणी प्रश्नासाठी केलेल्या प्रयत्नामध्ये त्यांचाही सहभाग असतो, त्यामुळे शुक्रवारी कडेगाव येथे होणाऱ्या या सभेला फार मोठे महत्त्व आहे. त्यामुळेच या सभेबद्दल सर्वत्र उत्सुकता आहे.