पानमळेवाडी येथे प्रामाणिकपणाचे दर्शन,साडे तीन तोळ्याचे गंठण केले परत…
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : कलियुगात माणुसकी हरवत चालली आहे,अस रोज ऐकत असताना आजही माणुसकी जिवंत आहे,असा प्रत्यय देणारी माणस देखील आपल्याला भेटतात आणि माणुसकीवर विश्र्वास बसतो.असाच प्रकार नुकताच दिसून आला. पानमळेवाडी येथे एका स्त्रीचे साडे तीन तोळ्याचे हरवलेले गंठण गावातील एका स्त्रीने आणि पुरुषाने प्रामाणिकपणे आणून दिले.तब्बल पंधरा तास चाललेल्या या प्रकारात संबंधित महिलेने अखेर निःश्वास सोडला.आणि खऱ्या अर्थाने भाऊबीज साजरी झाली.पानमळेवाडी येथील सौ.कल्पना पवार यांच्या कौटुंबिक संबंधातील एका व्यक्तीने नवीन चारचाकी घेतली होती.घरासमोर या चारचाकी पूजनाचा कार्यक्रम सुरू होता.सायंकाळचे आठ वाजले होते. चारचाकी पुजताना त्याला सोन लावावं अस म्हणतात म्हणून त्या घरच्या लक्ष्मीने गळ्यातलं साडे तीन तोळ्याच गंठण काढून पूजेला ठेवलं आणि ते तिथच विसरून गेली. कार्यक्रम झाला सगळे जिकडे तिकडे निघून गेले.पाहुणेही पाहुणचार झाल्यानंतर चारचाकी घेऊन निघून गेले.आणि पवार यांच्या लक्षात आले की गंठण पूजेला ठेवलेले ते तिथच राहिले.त्यांनी शोधाशोध सुरू केली. अकरा वाजले तरी गंठण सापडेना. शेवटी पाहुण्यांना फोन करून तुमच्या चारचाकीला गंठण अडकले आहे का बघा,असे सांगितले.सगळ्यांची तारांबळ उडाली.पाहुण्यांना आल्या रस्त्याने पुन्हा चारचाकी आणली.20 की.मी.रस्त्यावर शोधाशोध केली. मात्र गंठण सापडले नाही.रात्र सरता सरत नव्हती.डोळ्याला डोळा लागत नव्हता.सकाळ झाली, सगळे अस्वस्थ होते.तोपर्यंत सगळ्या गावात झालेली घटना समजली होती. आणि अचानक गावातीलच एका व्यक्तीचा फोन आला.गंठण सापडले आहे.घेऊन घरी येतोय.भास्कर सुरेश जगताप व सुवर्णा बाबुराव घोलप यांना हे गंठण रस्त्याला सापडले होते.आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.कल्पना पवार व त्यांचे पती राजेंद्र पवार यांनी जगताप व घोलप यांना बोलावून त्यांचा सत्कार केला.जगताप यांना ओवाळून खऱ्या अर्थाने भावासारखे धावून अलात म्हणून आभार मानले.यावेळी गावचे सरपंच नंदकुमार काळे,उपसरपंच गणेश चव्हाण,बाळासो पवार,बापूसो पवार,भीमराव पवार,शशिकांत पाटील,सरदार सावंत,उत्तम भोसले, संतोष सावंत,बाळासो भोसले, नामदेव भोसले उपस्थित होते.