छत्रपती शिवाजी महाराज मंडई सुसज्ज,हायटेक करणार : सुधीरदादा गाडगीळ; भाजीविक्रेते,फेरीवाले यांची प्रचारसभा
प्रतिष्ठा न्यूज
सांगली,दि. ११ : येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडई लवकरच सुसज्ज, हायटेक अशी बनवली जाईल,असे आश्वासन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिले.
भाजी मंडई येथील भाजी आणि फळ विक्रेते, हातगाडीवाले,फेरीवाले,फास्टफूड विक्रेते यांनी आमदार गाडगीळ यांच्यासाठी प्रचार सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी सुधीरदादा गाडगीळ बोलत होते. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार या सभेचे संयोजक होते. माजी आमदार नितीन शिंदे उपस्थित होते.
सुधीरदादा गाडगीळ यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत, घोषणांच्या जल्लोषात आणि लेझीम व हलगीच्या निनादात स्वागत करण्यात आले.
आमदार गाडगीळ म्हणाले, माजी आमदार (कै.) संभाजी पवार (आप्पा) यांच्यामुळे मी राजकारणात आलो. भारतीय जनता पक्षाचा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निवड अप्पानीच केली होती. त्यांच्याच कार्याचा आदर्श समोर ठेवून भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि फेरीवाले यांना बरोबर घेऊनच मी सांगलीच्या विकासासाठी काम करीत आहे. त्यामुळे भाजी मंडई अधिकाधिक चांगली करणार आहे. शहरातील भाजीविक्रेते फळ विक्रेते, फास्टफूडवाले, फेरीवाले यांना जास्तीत जास्त सुविधा कशा मिळतील याकडे मी लक्ष देणार आहे.
माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, लाडक्या बहिणीला आता २१०० रुपये दरमहा मिळणार आहेत. ती रक्कम तीन हजार करण्यासाठी सुधीरदादा शासन दरबारी प्रयत्न करणार आहेत. त्याचबरोबर ६५ वर्षावरील महिलांनाही या योजनेचा लाभ मिळावा यासाठी दादा प्रयत्न करणार आहेत. सुधीरदादाच ही मंडई सुसज्ज, अद्ययावत आणि सर्व सोयीनियुक्त बनवतील यात शंका नाही.
पृथ्वीराज पवार म्हणाले, आप्पा ज्याप्रमाणे भाजी विक्रेते,फळ विक्रेते, फेरीवाले यांच्या प्रश्नांसाठी काम करीत त्याचप्रमाणे सुधीरदादा गाडगीळसुद्धा काम करीत आहेत. मतदार संघाचा सर्वांगीण विकास करणारे आणि गोरगरिबांची कामे आस्थेने करणारे आमदार म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे. गोरगरीब, झोपडपट्टीवासीय, रस्त्यावरचे विक्रेते यांना मदत करण्यासाठी दादा नेहमीच पुढे असतात. त्यामुळे त्यांना आपण पुन्हा एकदा भरघोस मताधिक्याने विजयी करायचे आहे.
पवार म्हणाले, काँग्रेसने गरीबी हटाव अशा फक्त घोषणा केल्या. पण भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सरकार यांनी खऱ्या अर्थाने गरिबी हटवण्यासाठी काम केले आहे.
स्मिता पवार, विजय साळुंखे, भाजी विक्रेते व फेरीवाले संघटनेचे अध्यक्ष श्याम हिंदुराव कोकरे, मीना विष्णू चौगुले, आशा कोकरे, प्रकाश माळी, गजू नांदरेकर, राहुल कोकरे, सचिन वाकसे, राधिका सप्रोजी, जयश्री भोसले, सविता कटरे, अजित राजोबा, लता कांबळे, अनिल येडकर, अनिल सय्यद, फारुखभाई खलिभाई, शबीरा मुल्ला तसेच फेरीवाले, भाजी विक्रेते,हातगाडीवाले, फळ विक्रेते व फास्टफूड विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.