जनता हीच माझी स्टार प्रचारक : जयश्री मदन पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज पाटील यांनी माझ्या नावाशी समान असलेले दोन डमी उमेदवार उभे करून रडीचा डाव खेळाला. त्यांनी अपक्ष उमेदवारीची धास्ती घेतली आहे. तेच भाजपचे डमी उमेदवार आहेत अशी टीका काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांनी केली. अशी टीका जयश्री मदन पाटील यांनी पृथ्वीराज पाटील यांच्यावर केली.
त्या पुढे म्हणल्या, चाळीस वर्षानंतर महिला उमेदवाराला संधी मिळाली आहे. मला काही मिळवायचे नाही परंतु मदन भाऊंचा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे ही माझी भूमिका आहे. आजची रॅली ही माझी विजयाची रॅली असल्यासारखे मला वाटत आहे . माझ्या सभेत कोणत्याही स्टार प्रचारकाला बोलावले नाही कारण की जनता हीच माझी स्टार प्रचारक आहे. हे आजच्या गर्दीतून दिसून आले.
जयश्री पाटील म्हणाल्या, दादा घराण्याचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान होते. स्व. मदनभाऊंनी अनेक कार्यकर्ते घडवले, तीच माझी मालमत्ता आहे. मिरज दंगलीमुळे 2009 साली भाऊंचा पराभव झाला. हा पराभव जिव्हारी लागल्याने अपक्ष म्हणून मैदानात उभी आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सांगलीत आले होते. त्यांनी विरोधी भाजपच्या उमेदवाराबद्दल शब्द काढले नाहीत. माझ्यावरच आरोप केले. यावरून भाजपची बी टीम म्हणजे तेच आहेत, हे जनतेला आता कळाले आहे.
सांगलीत काँग्रेसचे पुरोगामी विचार रूजविण्याचे काम वसंतदादा घराण्याने केले आहे. पण दादा घराण्याविरोधात अनेक कुटील डाव केले जातात. जे लोकसभेच्या निवडणुकीत घडले तेच विधानसभेच्या निवडणुकीत घडत आहे. मतदारसंघाबाहेरील शक्तीकडून या त्रासदायक खेळी खेळल्या जात आहेत. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील भाजपचा पराभव करण्यासाठी जयश्री पाटील यांना साथ द्या, असे आवाहन खा. विशाल पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.
सांगली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचारार्थ सांगली येथील हिराबाग कॉर्नर येथे सांगता सभा झाली. या सभेत खा. विशाल पाटील बोलत होते. सभेला काँग्रेसचे युवा नेते डॉ. जितेश कदम, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा संघटक दिगंबर जाधव, वंचित बहुजन आघाडीचे नितीन सोनवणे, कॉ. शंकर पुजारी, सिकंदर जमादार, पुजा पाटील, माजी महापौर कांचन कांबळे, माजी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, माजी नगरसेवक युनूस महात, फिरोण पठाण आदी उपस्थित होते.
काँग्रेस पक्ष संपविण्याचा प्रयत्न मित्रपक्षांकडून केला जातो, पण तेच लोक आम्हाला आता निष्ठा सांगत असल्याचा टोला खा. विशाल पाटील यांनी लगाविला. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप होतो. पण अनेक कुटुंबातील व्यक्तिचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी पुढे येतात. त्यामुळे घराणेशाहीचा आरोप दुर्दैवी आहे. स्व.मदनभाऊ पाटील व त्यांच्या पश्चात जयश्री पाटील यांनी काँग्रेस जिवंत ठेवली. अनेकांना महापौर, नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य केले, महपौरपदावेळी विरोध असताना स्व. हारूण शिकलगार यांना जयश्री पाटील यांनी पद दिले. यात जाती-पातीचे राजकारण केले नाही. कार्यकर्त्यांना ताकद देणे हेच पक्ष वाढविणे असते. त्यांना पद हवे असते तर त्यांनी कधीच घेतले असते पण लोकांच्या इच्छेने त्या अपक्ष लढत आहेत. माझे देखील त्यांनी ऐकले नाही. पण या निवडणुकीत त्याच भाजपचा पराभव करतील, असा विश्वास खा. विशाल पाटील यांनी व्यक्त केला.
खा. विशाल पाटील पुढे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत ठराविक शक्ती असलेली लोक पुढे आली होती. भाजपची सुपारी घेऊन निवडणूक लढवत असल्याचा आरोप झाला. पण लोकसभेला नुरा कुस्ती होती. हे जनतेच्या लक्षात आले आणि त्यांचा प्रयोग फसला. निवडून आल्यानंतर काँग्रेसला एक दिवसात पाठिंबा दिला. आता विधानसभेच्या निवडणुकीत तीच शक्ती काम करत आहे. आमच्यावर भाजपची सुपारी घेतली असल्याचा आरोप होतो. पण आम्ही निष्ठावंत काँग्रेसचे आहोत. पण निष्ठा दाखवायला परिक्षा द्यावी लागत आहे, ही खंत आहे. दादा घराण्याला स्वातंत्र्याचा इतिहास आहे. महापालिकेत काँग्रेसची सत्ता घालविण्यासाठी मित्र पक्षाने भाजपला बरोबर घेऊन विकास आघाडीचा प्रयोग केला.
डॉ. जितेश कदम म्हणाले, स्व. मदनभाऊंच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर जयश्री पाटील निवडणूक रिंगणात आहेत. एका महिलेला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण सांगलीची जनता हे ओळखून आहे. सांगलीचे लोक राज्यातले राजकारण पाहत होते. त्यामुळे डाव कसा टाकायचा हे सांगावे लागत नाही.
दिगंबर जाधव म्हणाले, भाजपने ईडीची भिती दाखवली म्हणून जयश्री पाटील विधानसभेला उभारल्या असल्याचे पृथ्वीराज पाटील बोलत आहेत. पण त्यांना तशी भिती असली तर त्या लोकसभेला जाहीरपणे प्रचारात आल्या नसत्या. पृथ्वीराज पाटलांसारखे घरात बसल्या असत्या.
या सभेला माजी नगरसेवक संतोष पाटील, युनूस महात, शेवंता वाघमारे, रोहिणी पाटील, मृणाल पाटील, मोनिका पाटील, लालू मेस्त्री, रणजीत जाधव, आनंदा लेंगरे आदी उपस्थित होते. आभार उत्तम साखळकर यांनी मानले.
पृथ्वीराज पाटलांची भाजपबरोबर सेटिंग, मी साक्षीदार..
काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळणार नाही, हे लक्षात आल्यानंतर पृथ्वीराज पाटील यांनी भाजपबरोबर सेटिंग सुरू केली होती. याचा मी साक्षीदार आहे. त्यांना आज काँग्रेसची उमेदवारी मिळाली नसती तरी ते भाजपचे उमेदवार झाले असते, असा दावा स्थायी समितीचे माजी सभापती निरंजन आवटी यांनी व्यक्त केले.
मग सांगली दादाची का नाही?
दिगंबर जाधव म्हणाले की दहा हजार वर्षानंतर लंका कुणाची असं विचारल्यास ती रावणाची हेच उत्तर येते. मग सांगली वसंत दादांची का नाही? वसंतदादांनी सांगली घडवली आहे त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.