सेंट्रल स्कूलच्या वार्षिक क्रिडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न….
प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : येथील जागृती शिक्षण संस्था संचलित सेंट्रल स्कूलमध्ये वार्षिक क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी हिरारीने भाग घेऊन आपली खिलाडी वृत्ती दाखवली. या क्रिडा सामन्यांचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ. कल्याणी गद्रे, निष्ठा सामाजिक संस्थेच्या सौ. ज्योती सुर्यवंशी व निर्भया पथकाच्या प्रमुख सौ. छाया सुतळे (पोलीस उपनिरीक्षक), सौ. निलोफर हुजरे (सहा. पोलीस उपनिरीक्षक), सविता कसबे (पोलीस नाईक), श्री. उमेश निकम (पोलीस हवालदार) उपस्थित होत्या.
यामध्ये विविध सांघीक व वैयक्तिक क्रिडा स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. हेजल जेफरी बेलशर यांच्या हस्ते मेडल व प्रशस्तीप्रत्रक देऊन गौरवण्यात आले.
डॉ. कल्याणी गद्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आपण विविध स्पर्धेत सहभाग नोंदविला त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन”. तसेच अभ्यासाबरोबर खेळाची आवड साधल्यास निश्चितच सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.
निष्ठा सामाजिक संस्थेच्या प्रमुख ज्योती सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन करताना खेळाचे महत्व सांगितले. तसेच पालकांनी स्वतः मोबाईलचा वापर टाळून आपल्या मुलांकडे वैयक्तिक लक्ष दयावे, सतत इतर मुलांशी तुलना करणे, ओरडून बोलणे या गोष्टी कमी केल्या पाहिजेत असेही सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे संस्थापक श्री. बी. जे.पाटील व प्रशासकीय कार्यकारी सौ. भक्ती गौरव बेलवलकर व सेक्रेटरी श्री. शिवराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले.