प्रतिष्ठा न्यूज

आडी येथील श्री दत्त देवस्थान मठात पौर्णिमें निमित्त प्रवचन सोहळा संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : व्यवहारात धनसंपत्ती आदी भौतिक गोष्टींच्या संचयाला महत्व आहे.परंतु सद्विचारांच्या संचयाला व्यवहारात तसेच आध्यात्मिक क्षेत्रात अतिशय जास्त महत्व आहे. सद्विचारांचा संचय अनंत काळासाठी उपयोगाचा आहे,असे प्रतिपादन प.पू .परमात्मराज महाराज यांनी केले.ते आडी (ता .निपाणी) येथील संजीवन गिरीवरील श्रीदत देवस्थान मठाच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त सर्वेज्य सांस्कृतिक भवनात आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलत होते.यावेळी सकाळी श्रीदत मंदिरात श्री दत्तगुरूंच्या चरणचिन्हांवर अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली.रात्री साडेसात वाजता नामजपानंतर आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलतांना प.पू . परमात्मराज महाराज पुढे म्हणाले, संचय करणे म्हणजे साठा करणे. व्यवहारात धन संपत्ती,पाणी,तेल, धान्य इत्यादी गोष्टींच्या साठा करण्याला महत्व आहे.सद्विचारांचा साठा केल्यास व त्याचे रक्षण केल्यास  व्यावहारिक जीवनात आणि मरणानंतरही तो उपयोगात येणारा असतो.चोऱ्या करून पोट भरणाऱ्या एका बापाच्या पाच सहा वर्षाच्या मुलाने चोऱ्या करणे वाईट आहे.चोरी करून कोणी मोठे होऊ शकत नाही. त्या मुलाने केलेल्या उपदेशाने बापात सुधारणा झाली.सद्विचारांचा प्रकाश हवा दुर्विचाररूप अंधार नको. मुलांमधील सद्विचारांनाही महत्व आहे.भौतिक प्रकाश वाईट कामे करणाऱ्याच्या घरीही असू शकतो. मात्र तेथे सद्विचारांचा प्रकाश असत नाही,तेथे केवळ दुर्विचाराचा अंधार असतो.अनेक सुविचार शेअर केले जातात पण त्यातील किती सुविचार अंतःकरणात रुजले हे महत्वाचे आहे. काही काळासाठी दूध चांगले राहावे म्हणून दूध तापविले जाते.त्यातील बॅक्टेरियांना कमी केले जाते,नष्ट केले जाते.तसेच प्रायः ते पुन्हा निर्माण होऊ नयेत,वाढू नयेत,याची दक्षता घेतली जाते.याचाच अर्थ असा की त्यासाठी काहीतरी करावे लागतेच. त्याप्रमाणे सद्विचार चित्तामध्ये टिकून राहावेत म्हणून अनेक अनेक  सद्विचार देणारे ग्रंथ वाचावे लागतील, त्यांचे चिंतन करावे लागेल.सर्व जातिधर्म संप्रदायातील लोकांना उपयुक्त असे परमाब्धितील विचार डोक्यात साठवून ठेवावेत.काही श्रीमंत माणसे चांगल्या अथवा वाईट मार्गाने धनसंचय करतात.मात्र त्याचा उपयोग करीत नाहीत.त्या धनाचा काहीही उपयोग नाही.माणसाकडे सद्विचार असतील तर त्या धनाचा सदुपयोग होईल.जे नास्तिक आहेत, ज्यांची धनाचा उपयोग धार्मिक कार्यासाठी करण्याची इच्छा नाही, त्यांनी एखादा उद्योग धंदा सुरू करावा.त्यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होईल.अन्यथा धनसाठा करून मोहाने त्याच्या रक्षणासाठी सर्प योनीत जन्म घेऊन जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकण्याची पाळी येते.अनेक लोक धनाची  म्हणजेच अर्थाची इच्छा बाळगून भक्ती करतात.धनाचे महत्व असले तरी त्याहून सद्विचारांचे महत्त्व अतिशय जास्त आहे,जसे तुमचे विचार असतात तसे नियती खेळ करीत असते,म्हणून सद्विचारांचा साठा करणे आवश्यक आहे.मोक्षही सुयोग्य विचारानेच मिळत असतो.
आध्यात्मिक उन्नती साठी आवश्यक सद्विचारांवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे.अफवांवर विश्वास ठेवू नये.सत्य काय आहे ते जाणून घ्यावे. आध्यात्मिक मार्गाने वाटचाल केंव्हा सुरु झाली यावर त्या व्यक्तीचे आध्यात्मिक वय ठरत असते.केवळ देहाच्या वयोमानाला अध्यात्मात महत्व नाही.युद्धाने अनेक मोठ्या इमारती,अनेक धनाचे साठे,तेलाचे साठे,भौतिक गोष्टींचे साठे संपत आहेत.सद्विचारांचा साठा संपत नाही.  त्यामुळे सद्विचारांचा संचय करीत राहायला हवे.सद्विचाराने पुण्य घडते, पुण्यसाठा होतो.एका राज्यात एक मजूर काम करायचा.पण तो मजुरी घेत नव्हता.एक दिवशी मजुरीच्या बदल्यात राजाशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली.तेव्हा अनेक दिवसाची मजुरी न घेतल्याने त्याची ती इच्छा पूर्ण करण्यात आली.तेव्हा त्याला खूप आनंद झाला.राजालाही अशा निष्ठावंत नागरिकाला भेटून आनंद झाला.राजाने त्याला दरबारात ठेवून काम दिले.पुढे त्याच्या प्रामाणिक पणामुळे त्याला राजाने राज्याचा वारस बनविले.कैवल्य साम्राज्य मिळविण्यासाठी भौतिक आसक्ती सोडावी लागते असा या घटनेतून बोध घ्यावा.अध्यात्म मार्गात येऊन संसारी गोष्टी मागितल्या तर त्या मिळतात, मोक्षाची मागणी केल्यास तो मिळणार.भौतिक गोष्टी चोरीने मिळतील किंवा कोणत्याही मार्गाने मिळतील.पण मोक्ष साम्राज्य मिळविण्यासाठी सद्विचारांचा साठा करायला हवा.भोंदूगिरी जास्त काळ टिकत नाही.काहींच्या भोंदूगिरीमुळे अध्यात्म क्षेत्र बदनाम होत आहे. भोंदूगिरी मुळे कदाचित मर्यादित भौतिक सुख लाभेलही,परंतु अनंतकाळासाठी सुख लाभावे असे वाटत असेल तर सत्य मार्गाने चालावे लागते.सद्विचारांचा साठा असल्यास सत्य मार्गाने वाटचाल होत राहील, असे सांगितले.यावेळी प्रसाद वाशीकर हुपरी यांच्या वतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली होती.यावेळी डॉ.स्वाती पाटील कोल्हापूर,प्राचार्य डॉ.अमर चौगुले,कर निर्धारण,प्रशासकीय अधिकारी रामचंद्र मुधाळे,राजाराम चौगुले निपाणी,डॉ.नूतन चौगुले कागल आदी मान्यवर व देणगीदार भाविकांचा प.पू.परमात्मराज महाराज व देवीदास महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी आडी, बेनाडी,हंचिनाळ,कोगनोळी, हणबरवाडी म्हाकवे,आणूर,सौंदलगा पंचक्रोशीतील व कोल्हापूर,सांगली, सातारा,बेळगाव,सिंधुदुर्ग, सावंतवाडी,रत्नागिरी,पुणे,बेंगलोर, मुंबई यासह कर्नाटक,महाराष्ट्र व गोवा राज्यातील हजारो भाविकांनी प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेतला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.