जिजाऊ ब्रिगेडचे सातवे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारी सांगलीत होणार; हजारो महिला येणार; शोभायात्रेसह भव्य कार्यक्रम
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मराठा सेवा संघाचा एक भाग असलेल्या जिजाऊ ब्रिगेडचे सातवे राज्यस्तरीय अधिवेशन सांगलीत होत आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. हरिपूर येथील रॉयल पॅलेसमध्ये पार पडणाऱ्या या दोन दिवसाच्या अधिवेशनाला राज्यभरातून हजारो महिला उपस्थित राहणार असल्याची माहिती, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष प्रणिता पवार यांनी पत्रकारांना दिली.
या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून स्वप्नाली विश्वजीत कदम यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. मिरज तालुक्यातील हरिपूर येथील कृष्णा – वारणा नद्यांच्या संगमावरुन दि. 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी राजमाता जिजाऊ शोभायात्रा निघणार असून त्यादिवशी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. एक डिसेंबर रोजी सकाळी डॉ. अश्विनीताई घोरपडे ( पुणे ) यांच्या हस्ते आणि जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. दुसऱ्या सत्रात दुपारी संविधानातील स्त्री सक्षमीकरण याविषयी कायदा अभ्यासक डॉ. अर्चना थोरात यांचे व्याख्यान होणार आहे. तिसऱ्या सत्रात बदलती विवाह पद्धती आणि सामाजिक भान, कुटुंबातील स्त्री व अर्थकारण अशा दोन विषयांवर परिसंवाद होत आहे. चौथ्या सत्रात मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य जे करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या अधिवेशनाच्या संयोजनाच्या आयोजनाची जबाबदारी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष प्रणिता पवार, उपाध्यक्ष पूजा पाटील, कार्याध्यक्ष जयश्री घोरपडे, सचिव ज्योती सावंत, मानसी भोसले, अपर्णा खांडेकर, आशा पाटील, सुप्रिया घारगे, विद्या हारुगडे, रेखा पाटील, मृणाल पवार, शितल मोरे आणि जानवी पाटील या पार पाडत आहेत.