निमणीचे शिक्षक अविनाश गुरव बडतर्फ होणार ? पारदर्शक अहवाल सादर करण्याचे शिक्षण आयुक्तांचे आदेश?
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : निमनी येथील जिल्हा परिषद शाळेत खाजगी शिक्षिका नेमून सहा महिने गैरहजर राहून पगार घेणाऱ्या अविनाश गुरव शिक्षकाला बडतर्फ करा,अन्यथा शिक्षण आयुक्त पुणे कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दलित महासंघ (मोहिते गट) जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी आयुक्त सूरज मांढरे यांना निवेदनाद्वारे दिला आहे. आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये बहुजन गोर-गरीब समाजातील मुले शिकतात. निमनी येथील शिवाजीनगर वस्ती शाळेत अविनाश गुरव यांची शिक्षक म्हणून नियुक्ती आहे. परंतु अविनाश गुरव यांनी गेल्या सहा महिन्यापासून स्वतःच्या जागी खाजगी शिक्षिका नेमली आहे. गुरव हे शाळेत गेली सहा महिने गैरहजर राहत इतर अशैक्षणिक कामात व्यस्त-मस्त होते. अध्यापन न करता त्यांनी शासनाच्या गलेलठ्ठ पगारावर हात मारला आहे. पॅर्ट परीक्षा दरम्यान शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी शिवाजीनगर वस्ती शाळेला भेट दिली असता हा सर्व बोगस प्रकार उघडकीस आला आहे. शासनाकडून आपणाला मुलांच्या अध्यापनाचा पगार मिळतो याचे भान नसणारे शिक्षक गुरव यांचा मनमानी कारभार समोर आला आहे. अध्यापनाचे कार्य सोडून गैरमार्गाने खाजगी शिक्षिका नेमून गोर-गरीब बहुजन,वंचित समाजातील मुलांचे भविष्य अंधारमय गुरव यांनी केले आहे.मुलांच्या भविष्याशी खेळणाऱ्या गुरवसारख्या शिक्षकांची शिक्षण क्षेत्रात गरज नाही.गुरव यांच्या गैर प्रकारामुळे इतर प्रामाणिक कर्तव्य बजाविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याला व शिक्षण क्षेत्राला गालबोट लावले आहे.तेंव्हा झिरो तलाठी,झिरो पोलीस याप्रमाणे शिक्षण क्षेत्रात झिरो शिक्षिका नेमून शिक्षण क्षेत्राला गालबोट लावणाऱ्या अविनाश गुरव यांची शिक्षक म्हणून नियुक्ती झालेपासून त्यांच्या संपूर्ण कारभाराची स्वतंत्रपणे चौकशी करून बडतर्फ करावे,अशी मागणी निवेदनात जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी केली आहे.