संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 75 संविधान अंमलबजावणी परिषदांचे आयोजन पहिली संविधान अंमलबजावणी परिषद 15 डिसेंबरला कोल्हापूरात
प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर (प्रतिनिधी) : 26 नोव्हेंबर 2024 पासून भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव सुरु होत आहे. आपल्या देशात संविधानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. संविधानाची मूल्ये जन लोकांमध्ये रुजविण्यासाठी तसेच भारतीय संविधानाच्या मूलभूत विचारांची जनजागृती करण्यासाठी भारतीय संविधान जनजागृती अभियान आणि संविधान प्रेमी जनतेच्या वतीने आयोजित समविचारी पक्ष, संघटना, संस्था व व्यक्ती यांच्या विचार विनिमय व्यापक बैठकीमध्ये संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये वर्षभरात 75 संविधान अंमलबजावणी परिषदांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आपला अभिमान, भारतीय संविधान ही भूमिका घेऊन निवडक प्रतिनिधींची पहिली संविधान अंमलबजावणी परिषद रविवार दि. 15 डिसेंबर रोजी दुपारी 1:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी होणार असून 5 जानेवारी रोजी एक दिवसीय साहित्य व संस्कृती संमेलन, 26 जानेवारीला भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डाॕ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित ऐतिहासिक भारतीय संविधान या महाग्रंथावर प्रबुद्ध भारत हायस्कूल, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर या ठिकाणी महाभव्य महापरीक्षा आयोजित केली आहे. यामध्ये कोणताही भारतीय नागरिक सहभागी होऊ शकतो. 9 मार्चला समतावादी स्त्री-पुरुषांची संवाद गोलमेज परिषद, 13 एप्रिलला राज्यस्तरीय कवीसंमेलन, 12 मे रोजी संविधानवादी धर्मनिरपेक्ष जनतेची राज्यस्तरीय महापरिषद, 8 जूनला राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव, 3 ऑगस्ट रोजी भारतीय संविधान आणि आजची प्रस्तुतता या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र, 2 ऑक्टोंबर रोजी एक दिवसीय सृजनशील बाल साहित्य संमेलन आणि 26 नोव्हेंबर 2025 रोजी सलाम संविधान हा भव्य शाहिरी जलसा यासह निबंध व वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून वर्षभर संविधानाचा जागर करण्यासाठी प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर बैठकीला अनिल म्हमाने, ॲड. करुणा विमल, सुरेश केसरकर, मदन पवार, लालासो नाईक, विश्वासराव तरटे, अंतिमा कोल्हापूरकर, अनिता काळे, एम. व्ही. ऐनीकर, डॉ. अमोल महापुरे, गोपाळ कांबळे, रंगराव पाटील, महादेव चक्के, सुशीलकुमार प्रज्ञावंत , विनोद कांबळे, नारायण कांबळे, भिमराव धर्मवीर, एन. एम. नाईकवाडे, जी. एस. कांबळे, अनुजा कांबळे यांच्यासह निर्मिती विचारमंच, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, आम्ही भारतीय महिला मंच, निर्मिती फिल्म क्लब, बालसाहित्य कलामंच, प्रागतिक लेखक संघ, दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट, मुक्ता फाऊंडेशन, जागृत नागरिक सेवा संस्था, भारतीय बौद्ध महासभा या संस्था व संघटनेच्या प्रतिनिधीसह संविधान प्रेमी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.