विटा-म्हैशाळ रस्त्याची चाळण, दुरुस्ती करा अन्यथा रस्त्याला अभियंता घाडगे यांचे नाव देणार..जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांचा इशारा
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 असणारा विटा-तासगाव-म्हैसाळ रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या खड्यांमुळे अनेकांनी प्राण गमावले आहेत.सदर 65 किमी रस्त्यावरील खड्डे 10 दिवसात न भरल्यास या रस्त्याला कार्यकारी अभियंता श्रीधर घाडगे यांचे नाव देण्यात येईल,असा इशारा दलित महासंघ (मोहिते गट) जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता श्रीधर घाडगे यांना दिला आहे.
घाडगे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,विटा-तासगाव-म्हैसाळ रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी 2 कोटी 93 लाख 4 हजार 727 रुपयांचा ठेका दादासाहेब गुंजाटे कंपनीला देण्यात आला आहे.तरी गुंजाटे जाणीवपूर्वक कामाला विलंब करीत असून मंजूर आदेशाप्रमाणे काम करीत नाहीत.चालू काम निकृष्ठ व जुजबी स्वरूपाचे असून त्या कामामध्ये कोट्यावधी रुपयांवर डल्ला मारण्याचा निर्धार गुंजाटे व अधिकारी यांनी संगनमतानी केला आहे.गेली वर्षभर विटा-म्हैसाळ रस्त्यावर मोठे खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.सदर रस्त्यावरील प्रवाशी नागरिक जीव मुठीत घेऊन मृत्युंजय मंत्राचा जप करीत प्रवास करीत आहेत.यापूर्वी संघटनेच्या वतीने रस्त्यावरील खड्ड्यांची विधिवत श्राध्द पूजा घालून राष्ट्रीय महामार्ग विभागाचा निषेध केला.त्यावेळी जुजबी मलमपट्टी करून खड्डे भरण्याचा फार्स करण्यात आला.चांगल्या पद्धतीने खड्डे न भरल्यामुळे निष्पाप लोकं जीवाला मुकले असून आजही प्रवाशी मृत्यूच्या खाईतून प्रवास करीत आहेत.आता खड्डयामुळे अपघात होऊन नागरिक मृत्युमुखी पडल्यास संबधित ठेकेदार व अधिकारी यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल.रस्ता ठेकेदार व शाखा अभियंता यांच्यातील आर्थिक तडजोडीमूळे खड्डे भरण्याबाबत कुणी गांभीर्याने घेत नाहीत.परिणामी दिवसागणिक नागरिकांना खड्ड्यातून रस्ता शोधावा लागत आहे.निवेदनाच्या अनुषणगाने 10 दिवसात विटा-तासगाव-म्हैशाळ रस्त्यावरील खड्डे न भरल्यास सदर रस्त्यास कार्यकारी अभियंता श्रीधर घाडगे यांचे नाव देण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.