आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी संस्कृतमधून घेतली शपथ
प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि.७ : भारतीय जनता पक्षाचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आज आमदार पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. आज त्यांनी संस्कृतमधून शपथ घेऊन सर्वांनाच सुखद धक्का दिला.
सांगली विधानसभा मतदारसंघातून आमदार गाडगीळ यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅट्रिक केली आहे. अत्यंत लोकप्रिय, कार्यतत्पर आणि समाजाभिमुख लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी गेली दहा वर्षे काम केले आहे. त्यामुळे त्यांनी विधानसभेच्या या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला त्याचवेळी त्यांचा विजय निश्चित झाल्याचे त्या वेळच्या सभेत सांगण्यात आले होते.सुधीरदादा गाडगीळ हे विजयाची हॅट्रिक करणार अशी ग्वाही सर्वांनी दिली होती. त्यानुसार त्यांनी मोठ्या मताधिक्याने सांगली विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला.
गेल्या दहा वर्षात आमदार गाडगीळ यांनी लोकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले सतत लोकांमध्ये मिळून मिसळून राहणारे, लोकांना सहज उपलब्ध होणारे आमदार अशी त्यांची प्रतिमा आहे.आज त्यांनी संस्कृतमधून आमदार पदाची शपथ घेऊन या प्राचीन गिर्वाण वाणीवरील आपला विश्वास आणि श्रद्धा दर्शवली आहे. आमदार गाडगीळ यांनी शपथ पूर्ण करतानाच जय श्रीराम असाही घोष केला.