जगभरात सज्जनांची संख्या वाढून वैश्विक परिवार निर्माण व्हावा,प.पु. परमात्मराज महाराज.. आडीत श्री दत्त जन्मोत्सव सोहळा उत्साहात सुरु

प्रतिष्ठा न्यूज /किरण कुंभार
तासगाव : संपूर्ण विश्व सुसभ्य, सुसंस्कृत व्हावे अशी भावना प्राचीन ऋषी मुनींची आणि भारतीय संस्कृतीची आहे.तीच भावना परमाब्धि प्रतिपादित विचारांचीही आहे.दुर्जनांच्यात परिवर्तन होऊन जगभरात सज्जनांची संख्या वाढून वैश्विक परिवार निर्माण व्हावा,असे प्रतिपादन प.पू.परमात्मराज महाराज यांनी केले.ते आडी (ता.निपाणी) येथील संजीवनगिरी वरील श्रीदत्त देवस्थान मठाच्या वतीने श्रीदत्त जन्मोत्सव निमिताने आयोजित परमाब्धिविचार महोत्सवाच्या पाचव्या दिवशीच्या प्रवचन कार्यक्रमात बोलत होते.यावेळी सकाळी श्री दत्तगुरू चरणी अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली.यावेळी नामजप व भजन गायनानंतर श्री गुरुचरित्र पारायणाच्या तिसऱ्या दिवशीच्या सत्राचा भाविकांनी लाभ घेतला.रात्री साडेसात वाजता नाम जपानंतर आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलताना प.पू परमात्मराज महाराज पुढे म्हणाले, सद्धर्म आणि सुसंस्कृती टिकवून ठेवणे आवश्यक आहे.त्यासाठी परमाब्धि प्रतिपादित सद्धर्म समजून घ्यायला हवा.जगातील धर्ममूल्ये समजून घेणे महत्त्वाचे आहे.भारतीय संस्कृतीचे महत्व आहे पण अन्य संस्कृतीचाही आदर राखणे आवश्यक आहे.भारतीय संस्कृतीत,इथल्या मातीत मुळात विद्वेष नाही.म्हणून तर भारतात पारशी,ज्यू इ.लोकांना आदराने आश्रय दिला गेला.त्या संख्येने अत्यल्प असलेल्या लोकांनीही भारताची सेवा केली आहे. ज्यू व पारशी लोकांच्यावर इतरत्र अन्याय अत्याचार केले गेले त्यावेळी भारतात त्यांना सुरक्षितता वाटली. भारतीय विराट संस्कृती सर्वांना सामावून घेणारी आहे.वैदिक,जैन, बौद्ध,शिख आदी विचारधारांचा संगम भारतीय संस्कृतीमध्ये केला आहे. चूल पेटविण्यासाठी,विस्तव वाढविण्यासाठी फुंकर घालवी लागते. तसेच उष्णता कमी करून कपातील चहा थंड करण्यासाठी सुद्धा फुंकर घालावी लागते.अर्थात जगरूप परिवारात विशिष्ट दृष्टीने उपयुक्त भावनिक उष्णता वाढविण्यासाठी तसेच अनावश्यक उष्णता कमी करण्यासाठीही स्नेहाची फुंकर आवश्यक आहे.कालौघात सांप्रदायिक,धार्मिक कलह,हिंसाचार वाढला आहे.तेव्हा स्नेहाची फुंकर मारल्याने सौहार्दाची भावना व्यवस्थित ठेवण्याला निश्चितच मदत होईल.हायपरथर्मिया आजारात शरीरातील उष्णता नियंत्रक केंन्द्रामध्ये बदल न होता अचानक शरीराचे तापमान वाढते.साधा ताप हा जीवाणू,विषाणू किंवा अन्य काही कारणांनी उत्पन्न होतो.हायपर थर्मियात वाढलेले तापमान लवकर कमी होत नाही.संपूर्ण जगाला हायपरथर्मिया झालेला आहे.त्यामुळे जगाचे स्वाथ्य बिघडले असून हिंसाचार,युद्धे चालू आहेत.हे तापमान सामान्य होण्यासाठी प्रयत्न व्हावेत.परमाब्धि विचारांचा परिवार प्रत्येकाच्या डोक्यात विराजमान व्हावा.निरिच्छेने केलेल्या साधनेमुळे मोक्ष लाभ होतो.अन्न,धन,मान, मिळाला तरी इच्छा पूर्ण होत नाही. भौतिक इच्छा वाढत राहतात.इच्छा वाढली की चिंता वाढते.त्यामुळे सुख समाधान मिळत नाही.म्हणून अपरिमित इच्छा असू नयेत.इच्छांवर नियंत्रण ठेवले तर व्यक्तीगत सुख समाधान लाभेल.तसेच जगात शांती राहील.सर्वधर्म एक आहेत. वैमनस्यामुळे आणि भेदामुळे भिती राहते.अभयता आणि समाधान राहत नाही.विश्व एकाच चैतन्यशक्तीच्या नियंत्रणात चालले आहे तर अनेक धर्म कसे असतील.जगात एकच धर्म आहे.धृतराष्ट्राच्या आंधळेपणामुळे महाभारत घडले,लाखो लोक युद्धात मेले.त्याच्या दुर्बुद्धीमुळे त्याचाही शेवट वाईट झाला.सज्जन संख्येत वाढ व्हावी म्हणून माणसाने संयम ठेवावा.चांगल्या विचारांचा परिवार जनमनांमध्ये असावा.विश्व एक परिवार आहे ही भावना ठेवावी,असे सांगितले.यावेळी कर्नाटक राज्य माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील, आमदार शशिकला जोल्ले,माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले, हालशुगरचे उपाध्यक्ष पवन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. हरिपंथी भजनीमंडळ लखनापूर, गुरुमाऊली भजनीमंडळ गोरंबे, स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ जनवाड,बालकलाकार तबला वादक कु.चेतन सुतार गोरंबे,अजित शिंदे गळतगा,अभिजीत लोहार नानीबाई चिखली यांचे भजनाविभा आणि भजनसंध्या कार्यक्रमामध्ये भजन गायन झाले.यावेळी अविनाश जोशी मांगूर,सचिन शेटे तासगांव,केशव वाशीकर रेंदाळ,संतोष महाजन तासगांव यांच्या वतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली होती.आडी, बेनाडी,कोगनोळी,हणबरवाडी, हंचिनाळ,सौंदलगा,निपाणी,कागल, बेळगांव,कोल्हापूर,सांगली,पुणे, मुंबई,सिंधुदुर्ग,रत्नागिरी,सा तारा, छ.संभाजीनगर आदी भागातील असंख्य भाविकांची उपस्थिती होती.