गटशिक्षणाधिकारी लावंड यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी दलित महासंघ बेमुदत धरणे आंदोलन करणार

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव गटशिक्षणाधिकारी आबासाहेब लावंड यांचेवर कारवाई न करता वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत असल्याने मुख्य कार्यकारी तृप्ती धोडमिसे यांचे निषेधार्थ सांगली जिल्हा परिषदेसमोर दि 28 जानेवारीपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दलित महासंघ (मोहिते गट) जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना दिलेल्या निवेदनात केदार यांनी म्हंटले आहे की,निमणी (ता.तासगाव) येथील छ.शिवाजीनगर वस्तीशाळेत झिरो शिक्षिका नेमणूक प्रकरणी शाळेचे शिक्षक अविनाश गुरव व केंद्रप्रमुख किसन चौगुले निलंबित आहेत.निमणीच्या वस्तीनगर शाळेतील मनमानी कारभाराकडे दुर्लक्ष करणारे निलंबित शिक्षकासह गटशिक्षणाधिकारी आबासाहेब लावंड हे सुद्धा तितकेच दोषी आहेत.आबासाहेब लावंड यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे.त्यांनी नेहरूनगर वस्ती शाळेला सहा महिन्यात भेट दिली नाही.शाळा व्यवस्थापन समितीचा आढावा घेतला नाही.निलंबित शिक्षक अविनाश गुरव अध्यापन न करता गैरहजर राहून पगार घेत असल्याची पूर्ण कल्पना लावंड यांना होती.तरी त्यांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रार दिली नाही.लावंड यांनी पदाचा गैरवापर केला असून प्रशासनाची फसवणूक करीत शिक्षण क्षेत्राला गालबोट लावले आहे.या अनुषंगाने यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड यांचेकडे वारंवार तक्रारी देऊनही कारवाई झाली नाही.वरिष्ठ अधिकारी आबासाहेब लावंड यांना पाठीशी घालत आहेत.त्यामुळे तुप्ती धोडमिसे यांचे निषेधार्थ दि.28 जानेवारीपासून जिल्हा परिषद सांगली कार्यालयासमोर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.उत्तम मोहिते यांचे आदेशाने बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी निवेदनात दिला आहे.