प्रतिष्ठा न्यूज

क्षत्रिय मराठा कदम परिवाराचे सातवे राज्यस्तरीय कुलसंमेलन यंदा खेडमधील जामगे गावात

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव: महाराष्ट्रातील प्राचीन कदम घराण्याचे सातवे भव्य राज्यस्तरीय कुलसंमेलन यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील जामगे ( खेड ) येथे माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार 8 फेब्रुवारी व रविवार 9 फेब्रुवारी यादिवशी आयोजित करण्यात आले आहे.प्राचीन सत्ताधीश कदंब राजवंशाचा इतिहास लाभलेल्या कदम कुटुंबीयांना स्वतःचे कुलाचार,परंपरा,वारसा याबद्दल माहिती व्हावी,तसेच घराण्यातील नामवंतांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून क्षत्रिय मराठा कदम परिवार संस्थेने आजतागायत तुळजापूर, गिरवी ( फलटण ), गढीताम्हाणे ( सिंधुदुर्ग),गलांडवाडी ( दौंड) , धामदरी ( नांदेड),आणि आंबेचिंचोली( पंढरपूर) याठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहेत. यंदाचे सातवे राज्यस्तरीय वार्षिक कुलसंमेलन कोकणातील खेडजवळच्या जामगे या गावामध्ये 8 व 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे.या कुलसंमेलनासाठी विद्यमान गृहराज्यमंत्री ना.योगेश कदम यांचे मूळगावामध्ये महाराष्ट्रासह गोवा, मध्यप्रदेश,कर्नाटक,बडोदा या राज्यातूनही कदम बांधव उपस्थित राहणार आहेत.व्यवसाय तसेच विविध कारणांमुळे वेगवेगळ्या गावा शहरांमध्ये वास्तव्यास असलेल्या कदम घराण्यातील व्यक्ति कुलसंमेलना निमित्त एकत्र येणार असून,घराण्याचा जाज्वल्य वारसा जपण्याचा मानस मेळाव्यातून केला जाणार आहे.कुलसंमेलनाच्या पहिल्या दिवशी शनिवारी 8 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता कुलदेवता श्रीतुळजाभवानीच्या जागर गोंधळाने कार्यक्रमाची सुरूवात होणार आहे.तसेच मागील कुलसंमेलनाच्या छायाचित्रांचा स्लाईड शो दाखवला जाणार आहे. कुलसंमेलनाच्या मुख्य दिवशी सकाळी जामगे गावचे ग्रामदैवत श्रीकोटेश्वरी मानाई देवीचे दर्शन आणि पूजन झाल्यानंतर कदंब राजवंशाचे ध्वजारोहण गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे हस्ते होणार आहे.त्यानंतर बदलापूर येथील सुप्रसिद्ध शस्त्रसंग्राहक सुनील कदम यांच्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.कदम कुलसंमेलनाचे उदघाटन माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते झाल्यानंतर प्रा.डाॅ.सतीश कदम, उद्योजक मनोज कदम आणि चिपळूण येथील पराग कदम यांची कदम घराण्याचा इतिहास आणि सद्यस्थितीतील तरूणांना मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहेत.  मागील वर्षभरात ज्या ज्या कदम बंधू किंवा भगिनींनी उल्लेखनीय कार्य केले आहे अशा कर्तृत्ववान कदमांचा सन्मान सोहळा सुध्दा संपन्न होणार आहे.या कुलसंमेलनास सांगली लोकसभा खासदार विशाल पाटील ( कदम ),गृहराज्यमंत्री योगेश कदम, परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर ( कदम ), पलूस कडेगावचे आमदार विश्वजीत कदम, घाटकोपर पश्चिम मतदारसंघाचे आमदार राम कदम,नांदेडचे हदगाव विधानसभा आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची उपस्थिती लाभणार आहे.कुलसंमेलनाचे निमंत्रक खेड पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत गंगाराम कदम असून या राज्यस्तरीय कुलसंमेलनास सर्व कदम बंधूंनी उपस्थित राहण्याचे आवाहन क्षत्रिय मराठा कदम परिवार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अमरराजे कदम,सचिव रामजी कदम,सल्लागार माऊलीशेठ कदम पाटील,अमोल कदम तसेच कदम परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
Show More

Related Articles

Back to top button
Don`t copy text!