प्रतिष्ठा न्यूज

तासगाव तालुका सहकारी बायो शुगर (ग्लुकोज फॅक्टरी) कारखान्याचे चेअरमन मस्के पदावर राहण्यास अपात्र

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव:निमणी येथील श्री दत्त सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित निमणी या संस्थेचे थकबाकीदार असल्याने जगन्नाथ पांडुरंग मस्के यांना यापूर्वीच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,तासगाव यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३( क) (अ) (१) नुसार अपात्र घोषित केले आहे.
त्यानुसार त्यांना पुढील ५ वर्षाकरिता कोणत्याही सहकारी संस्थेत संचालक अथवा पदाधिकारी म्हणून कार्यरत राहता येणार नाही असा आदेश झाल्याने निमणी येथील प्रकाश पाणीपुरवठा व श्री चमन ग्रेप ग्रोअर्स या दोन्ही संस्थेच्या संचालक पदावरून दूर केले होते.तासगाव तालुका सहकारी बायो शुगर कारखाना (ग्लुकोज फॅक्टरी) या संस्थेची अनेक वर्षे वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली नव्हती.
२९ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जगन्नाथ मस्के हे या संस्थेच्या चेअरमन पदावर कार्यरत असल्याचे समजले होते.या संदर्भात त्यांना सदर संस्थेच्या चेअरमन पदावरून हटवावे तसेच कायद्यानुसार अपात्र असलेचे माहित असुनही चेअरमन पदावर कार्यरत राहून संस्थेच्या निबंधकाची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी तक्रार आर डी पाटील निमणी यांच्या कडून दाखल झाल्याने सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था तासगाव यांनी याप्रकरणी वेळोवेळी सुनावण्या घेतल्या होत्या.हजर केलेल्या कागद पत्रानुसार जगन्नाथ मस्के हे तासगाव तालुका सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदावर असल्याचे निश्चित झाले होते तसेच श्रीदत्त सहकारी पाणीपुरवठा या संस्थेच्या लेखा परीक्षण अहवालात मस्के यांची रुपये १,७५,००० थकबाकी असल्याचे सिद्ध झाले होते.
सुनावणी दरम्यान मस्के यांच्यावतीने सांगली येथील ज्येष्ठ वकील सुनील नानवाणी यांनी युक्तिवाद केला होता. तक्रारदार आर डी पाटील यांनी स्वतः बाजु मांडली होती.सहाय्यक निबंधक यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून व कागदपत्राची पडताळणी करून मस्के यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० चे कलम ७३ (क) (अ) १ नुसार अपात्र ठरवले आहे.
या संस्थेचे काही रेकॉर्ड मस्के यांच्या कार्यालयात तर काही रेकॉर्ड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात आहे.सभासदांनी जमा केलेल्या शेअर्स रक्कमेचा ताळमेळ नाही. काही सभासदांच्या कडे पावत्या आहेत मात्र त्यांची नावे सभासद यादीत नाहीत.सभासदांकडून गोळा केलेली शेअर्सची रक्कम संस्थेकडे जमा दिसत नाही.संस्थेकडे एकूण १,१४,०००,०० रुपये (एक कोटी चौदा लाख रुपये) जमा दिसत आहेत.संस्थेचे कामकाज सुरू होणार नसलेस सभासदांची रक्कम व्याजासह परत करावी अशी मागणी आर डी पाटील यांनी केली आहे.