बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राज्यभर चक्का जाम : महेश खराडे यांची माहिती

प्रतिष्ठा न्यूज
सांगली / प्रतिनिधी : संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन विधानसभा निवडणुकीत महायुतीने दिले होते. ते पाळले नाही त्यामुळे त्या आश्वासनाची तात्काळ पूर्तता करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, या मागणीसाठी अमरावती येथे सुरु असलेल्या माजी आमदार बचू कडू यांच्या बेमुदत उपोषणास पाठींबा म्हणून सांगली जिल्ह्यात रविवार दिनांक 15 जून रोजी ठिकठिकाणी रस्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.
खराडे म्हणाले माजी बचू कडू यांनी गेल्या पाच दिवसापासून बेमुदत उपोषण अमरावती येथे सुरु केले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्या, अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये मदत द्या, द्राक्ष, डाळिंब, सह फळ बागायतदारांना मदत करा, अपंगाना महिन्याला सहा हजार मानधन सुरु करा, बेरोजगार तरुणांना दर महा पाच हजार मानधन सुरु करा. आदी मागण्यासाठी सदर उपोषण सुरु आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी माजी खा राजू शेट्टी यांनी भेट देऊन रविवार दिनांक 15 जून रोजी राज्यभर चक्का जाम चा इशारा दिला आहे.
त्यामुळे सांगली जिल्यातही लक्ष्मी फाटा, तासगाव, इस्लामपूर, विटा, शिराळा, म्हैशाल उड्डाणं पूल, जत, कडेगाव, पलूस आदी ठिकाणी रविवारी सकाळी दहा वाजल्या पासून चक्का जाम होणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले तरच राज्य सरकार या आंदोलनाची दखल घेईल अन्यथा शेतकऱ्याचा या आंदोलनास पाठींबा नाही असे गृहीत धरून सर्व मागण्यांना केराची टोपली दाखवली जाईल त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना कळकळीचे आवाहन आहे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने चक्का जाम आंदोलनात सहभागी व्हावे.