तासगाव नगरपरिषदेचा आदर्श कार्यालय म्हणून गौरव”

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय विभागामार्फत राबविण्यात आलेल्या १०० दिवसांच्या सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत शासकीय कार्यालयांचे नुकतेच मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यमापनामध्ये सांगली जिल्ह्यातील तासगाव नगरपरिषदेस गौरवप्राप्त मानांकन मिळाले असून तासगाव नगरपरिषद एक आदर्श कार्यप्रणाली असलेले कार्यालय म्हणून पुढे आले आहे.ही विशेष मोहीम कार्यक्षम,पारदर्शक आणि जनहितकारी प्रशासन सक्षम करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आली होती अशी माहिती मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांनी दिली.यामध्ये नागरी सेवा वितरणाची गती,दैनंदिन कार्यपध्दतीतील सुधारणा,तांत्रिक प्रणालींचा वापर,नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही, कार्यालयीन शिस्त आणि विविध महत्त्वाच्या घटकांचा समावेश होता. तासगाव नगरपरिषद या सर्व निकषांवर अत्यंत यशस्वी ठरली.
नेतृत्व, संघटन आणि सत्काराचा गौरव…
या यशाचे श्रेय तत्कालीन मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील आणि संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या एकसंध व समर्पित प्रयत्नांना जाते. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने तासगाव नगरपरिषद कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण ठरली आहे.या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तासगाव नगरपरिषदेचा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या प्रसंगी उपस्थित सर्व अधिकारी,कर्मचारी आनंद व्यक्त केला.राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून ही कामगिरी अभिनंदनास पात्र ठरली असून, सांगली जिल्ह्याच्या इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तासगाव नगरपरिषद ही प्रेरणादायी ठरेल,असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.यावेळी प्रवीण शिंत्रे,शिवम माने,श्रीधर चव्हाण,माधुरी माळी,तुकाराम पाटील,कार्यकारी अभियंता उमेश तळदेकर उपस्थित होते.