प्रतिष्ठा न्यूज

महात्मा गांधी स्मारक रुग्णालयाला सर्वोत्तम कामगार रुग्णालय बनविणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

प्रतिष्ठा न्यूज
मुंबई, दि. १८: महात्मा गांधी स्मारक रुग्णालयाला गतवैभव मिळवून देत राज्यातील सर्वोत्तम कामगार रुग्णालय बनविणार असल्याचा मानस सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला आहे.
महात्मा गांधी स्मारक कामगार रुग्णालयातील सभागृहात आयोजित बैठकीत आरोग्य मंत्री श्री. आबिटकर बोलत होते. बैठकीस विधान परिषद आमदार चित्रा वाघ, केंद्रीय कामगार विमा योजनेच्या क्षेत्रीय संचालक अभिलाषा झा, राज्य कामगार विमा योजनेचे आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, कामगार रुग्णालय मुख्य अभियंता अश्विन यादव, रुग्णालय अधिक्षिका मेघा आयरे आदी उपस्थित होते.

आरोग्य मंत्री म्हणाले, महात्मा गांधी स्मारक रुग्णालय हे मुंबईतील एक महत्त्वाचे व मध्यवर्ती ठिकाणी असलेले रुग्णालय आहे. या रुग्णालयात सर्व वैद्यकीय सेवा तातडीने सुरू कराव्यात, विशेषतज्ञांची पदे भरावीत. केईएम रुग्णालयात बेड उपलब्ध होऊ न शकणाऱ्या तसेच महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णांना या रुग्णालयाने उपचार द्यावेत.
दक्षता विभाग तातडीने सुरू करून रुग्णालयाकरिता आवश्यक यंत्रसामग्री व मागण्यांचा प्रस्ताव तातडीने द्यावा, अशा सूचनाही आरोग्य मंत्री श्री आबिटकर यांनी दिले.
रुग्णालयाला आरोग्य मंत्री यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान शस्त्रक्रिया कक्ष, स्त्री रुग्ण कक्ष, बालकांचा कक्ष, व्हेंटिलेशन रूम, तसेच रुग्णालयातील विविध सुविधांची आणि परिसराची पाहणी केली.

कामगार रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा ग्रॅज्युएटी संदर्भातील १५ वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न आरोग्यमंत्र्यांनी सोडवल्याबद्दल यावेळी कर्मचारी संघटनेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
सन १९६२ नंतर मुंबईतील महात्मा गांधी रुग्णालयाला भेट देणारे प्रकाश आबिटकर हे पहिले आरोग्यमंत्री असल्याचे आमदार चित्रा वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले आहे.

यावेळी आमदार चित्रा वाघ यांचे निधीतून दिलेल्या सुविधा, तसेच रुग्णालयातील नूतनीकरण केलेले सभागृह व पोर्टेबल एक्स-रे मशीनचे उद्घाटन आरोग्य मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.