घाटनांद्रेत भरदिवसा धाडसी घरफोडी, अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास

प्रतिष्ठा न्यूज
घाटनांद्रे/वार्ताहर :- घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथे भरदिवसा व भरवस्तीत तसेच अगदी ग्रामपंचायत लगत असणार्या बाबासाहेब परसराम शिंदे (वय-७८) यांचे बंद असणार्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांने सुमारे अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची फिर्याद बाबासाहेब परशराम शिंदे यांनी कवठेमहंकाळ पोलिसात दिली असून,आज्ञाता विरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून व घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी की मंगळवार दिनांक १७ रोजी सकाळी ७.०० ते सायंकाळी ५.३० दरम्याने फिर्यादीच्या घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व कपाटाच्या चाव्या ठेवलेल्या डब्यातून चावी घेऊन कपाट उघडून मुद्दे माल लंपास केला आहे.
यामध्ये १२५०००/- रुपये किंमतीचे २५ ग्रॅम सोन्याचे नेकलेस,५००००/- रुपये किंमतीचे १० ग्रॅम सोन्याची चेन,२५०००/- रुपये किंमतीची लहान मुलांची गळ्यातील चेन,५००००/- रुपये किंमतीचे कानाचे वेल,४ ग्रॅम वजनाचे टॉप्स,२ ग्रॅम वजनाचे गळ्यातील बदाम,तर ५०००/- रुपये किंमतीच्या चांदीच्या वस्तू असा एकूण दोन लाख पंचावन्न हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे,पोलिस निरीक्षक जोतीराम पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली व तपासाच्या सुचना केल्या.याव़ेळी श्वानपथक व ठसे तज्ञांची मदत घेण्यात आली.भरदिवसा व भरवस्तीत गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी धाडसी चोरी झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे.