डॉ. आंबेडकर डोक्यावर नव्हे, तर त्यांचे विचार डोक्यात घ्या : प्रा. लक्ष्मणराव ढोबळे ; सांगलीत राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचा मेळावा

प्रतिष्ठा न्यूज
अक्षय कोठावळे / सांगली : राज्यघटनेचे शिल्पकार. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आयडॉल मानून मुलांनी अभ्यास करावा. डॉ. आंबेडकर डोक्यावर नव्हे, तर त्यांचे विचार डोक्यात घ्या, असे आवाहन माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचा जिल्हास्तरीय मेळावा बुधवारी सांगलीतील भावे नाट्यगृहात झाला. त्यावेळी प्रा. ढोबळे बोलत होते. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते.
मेळाव्याला सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदेव गायकवाड, प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे, आमदार अरुण लाड आदी उपस्थित होते.
प्रा. ढोबळे म्हणाले, आजच्या पिढीने डॉ. बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेतले पाहिजेत. त्यांच्या जयंतीवेळी रस्त्यावर नाचण्यापेक्षा बुध्दविहारमध्ये जा. बाबासाहेब आपल्या कामात रमणारे होते. जगातील सर्व पदव्या त्यांनी खिशात घातल्या होत्या. चांगुलपणाने त्यांनी विशाल सागर निर्माण केला. दुःखातही त्यांनी शिक्षणामध्ये खंड पडू दिला नाही. राज्यघटनेसारखे सामर्थ्य त्यांनी देशाला दिले. त्यांच्यात बौध्दिक सामर्थ्य होते. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची गरज आहे. राज्यघटना चांगली आहे, पण चालविणारे चांगले नाहीत, त्यामुळे घटनेला दोष देऊ नका.
ते म्हणाले , सामाजिक न्याय विभागाच्यावतीने विविध मंडळांकडून सवलतीच्या योजना राबविल्या जात असून याचा लाभ घ्यावा, जर त्या सवलतीपासून समाज वंचित राहत असेल तर त्यासाठी रस्त्यावर उतरा.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी डॉ. बाबासाहेब यांनी घटनेत आरक्षणाची तरतूद केली. मतांची ताकद दिली. पुढे जाणाऱ्यांना लगाम घातला. राज्यघटना किती अभेद्य आहे, हे यावरून स्पष्ट होते.
फुले, शाहूंचा विचार त्यांनी पुढे नेला. मागासलेल्यांना न्याय मिळण्यासाठी संघटित होण्याची गरज आहे. जिल्ह्यात संघटितपणे काम करा. जेथे दलितांवर अत्याचार होतील, त्या ठिकाणी संघटना म्हणून पुढे या. सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदेव गायकवाड म्हणाले, देशात लोकशाही आहे का..?
असा प्रश्न पडत आहे. बाबासाहेबांच्या स्वप्नातील लोकशाही संपुष्टात येत आहे. धर्मनिरपेक्ष समाज संकल्पनेला सुरूंग लावला जात आहे. खोटा प्रचार केला जात आहे. केंद्र सरकार घटनाविरोधी असल्याचे दिसून येत आहे. प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे म्हणाले, वैचारिक लढाईसाठी रस्त्यावर उतरावे लागेल. यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, ज्योती आदाटे यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी सामाजिक न्यायासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, अॅड. बाबासाहेब मुळीक, अनिता सगरे, शेखर माने, सामाजिक विभागाचे शहराध्यक्ष कुमार लोंढे, सुश्मिता पाटील, संगीता हारगे, अॅड. चन्नाप्पा होर्तीकर, मन्सूर खतीब, रमेश पाटील, महादेव अंकलगी, विवेक कोकरे, राहुल पवार, हरिदास पाटील आदी उपस्थित होते. जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी आभार मानले.
