शिक्षक पित्यानेच केला मुलीचा खून; नेलकरंजीच्या घटनेने समाजमन सुन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : स्पर्धेचें युग असल्याने आपल्या मुलांप्रति पालकांच्या शैक्षणिक अपेक्षांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. स्पर्धेच्या युगात नीट, जीईई यासह सर्वच स्पर्धा परीक्षांवर पालकांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. विविध अकॅडमी जादा क्लासेसच्या माध्यमातुन मुले बारावीनंतर मेडीकल, इंजिनिअरिंगसह विविध क्षेत्रासाठी नशिब आजमावत आहेत. परंतु यामध्ये अपेक्षांची पुर्तता न झाल्याने ताण तणावातून अनेक मुलांचा बळी जात आहे. याच अपेक्षेतुन नेलकरंजी येथील शिक्षक असलेल्या पित्यानेच मुलीचा खून केल्याची हृदयद्रावक व संतापजनक घटना घडली आहे.
याबाबत अधीक माहिती अशी की, आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथील माध्यमिक शिक्षक थोंडीराम भोसले यांची कन्या साधना इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होती. मागील तीन वर्षापासून ती आटपाडीत राहून कॉलेजमध्ये नीटचा अभ्यास करत होती. हुशार साधनाचा हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीत पहिला क्रमांक आल्याने साधनाकडून तिच्या कुटुंबियांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. घरातील कार्यक्रमासाठी साधनाला कुटुंबियांनी होस्टलमधून गावी नेलकरंजी येथे बोलावून घेतले होते. कॉलेजमधील टेस्टमध्ये तिला कमी मार्क्स मिळाल्याने शिक्षक असलेल्या वडिलांनी नाराजी व्यक्त करत साधनाला शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बेदम मारहाण केली. जात्याच्या लाकडी खुंटीने साधनाला मारहाण केल्याने गंभीर जखमी होवून ती बेशुध्द झाली. त्यानंतर तिला कुटुंबियांनी आटपाडीतील खासगी दवाखान्यात दाखल केले. येथे उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने तिला सांगलीला नेण्यात आले. सांगलीतील दवाखान्यात तिला मृत घोषित करण्यात आले. लाकडी खुंटीने झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. मृत साधना हिचे शवविच्छेदन केल्यानंतर तिला संपर्ण अंगभर बेदम मारहाणीने झालेली इजा अत्यंत गंभीर असल्याचे व त्यातच तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.शनिवारी रात्री उशिरा तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मुलीला मारहाण करून तिचा खून केल्याप्रकरणी साधनाची आई प्रीती धोंडीराम भोसले यांनी पती धोंडीराम यांच्याविरोधात आटपाडी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार आटपाडी पोलिसात रविवारी पहाटे घोंडीराम भोसले यांच्यावर खुनासह २०१५ च्या कलम ७५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी तत्काळ हालचाली करत मुलीच्या खूनप्रकरणी थोंडीराम भोसले याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असते २४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. चाचणी परीक्षेत मार्क कमी मिळाल्याच्या कारणावरून गंभीर मारहाण करून मुलीचा बळी घेण्याच्या या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे. शिक्षकी पेशा असलेल्या वडीलानेच केलेली कृती गंभीर विचार करायला लावणारी आहे. शनिवारी शिक्षक धोंडीराम भोसले यांनी शाळेत योगदिनात सहभाग नोंदविला होता. त्याचवेळी साधना ही दवाखान्यात शेवटच्या घटका मोजत होती. केवळ गुणांसाठी झालेल्या अमानुष मारहाणीत हुशार असलेल्या मुलीचा बळी जाण्याच्या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.



