पोलिसांची तत्परता ठरली जीव वाचवणारी ; जांभुळणेवाडी वळणावर अपघात!

प्रतिष्ठा न्यूज: तुकाराम पडवळ
गगनबावडा : कोल्हापूर–गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर जांभुळणेवाडी (ता. गगनबावडा) वळणावर मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता दुचाकी अपघात झाला. रिफ्लेक्टर पोलला धडकून कुमार परशुराम कंकणवाडी (वय २८, रा. कवळी, जि. बेळगाव) नाल्यात कोसळले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते बेशुद्ध अवस्थेत होते.
घटनेची माहिती मिळताच गगनबावडा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. कार्यतत्पर सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ व कॉन्स्टेबल दिगंबर पाटील, मानसिंग सातपुते, सुरज देसाई, अशोक पाटील आणि विलास गायकवाड यांनी दाखवलेली तत्परता व सतर्कता मोलाची ठरली. त्यांच्या मदतीने जखमीला त्वरित गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले व पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिरावत आहे.
ही घटना महामार्गावरील सुरक्षा उपाययोजनांची पुनर्तपासणी करण्याची गरज अधोरेखित करते .
“पोलिसांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे एका तरुणाचा जीव वाचला. त्यांच्या कार्याची ग्रामस्थ व नागरिकांकडून सर्वत्र प्रशंसा होत आहे.”