प्रतिष्ठा न्यूज

गवा हल्ल्यांबाबत ग्रामस्थांचा आवाज: गगनबावड्यात जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता. ३ : गगनबावडा तालुक्यात वन्य प्राण्यांमुळे होत असलेल्या सततच्या त्रासाविरोधात ग्रामस्थांनी आज ठोस पावले उचलली. मा. जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब तालुका दौऱ्यावर असताना त्यांची भेट घेऊन सांगशी व सैतवडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने एक महत्त्वपूर्ण निवेदन त्यांना सादर करण्यात आले.

निवेदनात गवा व इतर वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान, आणि काही दिवसांपूर्वी भुतलवाडी येथे घडलेली थरारक गवारेड्याची घटना याची सविस्तर माहिती देण्यात आली. शेतकरी वर्गावर आलेल्या संकटाची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी तत्काळ उपाययोजना कराव्यात, वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, अशा ठाम मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या.

या प्रसंगी सांगशी व सैतवडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजस्विनी वरेकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. विशाखा पडवळ, पोलीस पाटील, संजय वरेकर,  सुरेंद्र पारगांकर, विशाल पडवळ, भिवाजी वरेकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांच्या या एकत्रित प्रयत्नांमुळे प्रशासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.