प्रसंगी हातात शस्त्र घेवू,पण शक्तिपीठ होऊ देणार नाही – महेश खराडे; गुन्हे दाखल करा, तुरुंगात घाला

प्रतिष्ठा न्यूज
सांगली / प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्ग आंदोलन मोडीत काढायचे षडयंत्र सरकारचे चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी रास्ता रोको आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांच्या वर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र छत्रपती शिवाजी महाराज, शहिद भगतसिंगांचे वारसदार आहोत. गुन्हे दाखल करा, तुरुंगात टाका प्रसंगी हातात शस्त्र घेवू, नक्षलवादी होऊ, मात्र रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यंत आम्ही लढू आणि जिंकू असा विश्वास स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी व्यक्त केला.
खराडे म्हणाले काळी माती ही आमची आई आहे. आमची माता आहे. आमची आई कवडीमोल किंमतीने आमच्या कडून हिसकावून घेताना ही आम्ही गप्प बसावे, आम्ही उध्वस्त होतानाही आम्ही शांत राहावे, आम्ही ब्र शब्द काढू नये. हीच शासनाची भूमिका आहे. त्यामुळेच मंगळवारी अंकली या ठिकाणी करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झालेल्या खा विशाल पाटील यांच्या सह आमच्या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांच्या वर गुन्हे दाखल करण्यात आले.
मात्र आम्ही सरकारला सांगू इच्छितो आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, शहिद भगतसिंग, नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या विचारांचे वारसदार आहोत. आम्ही लढणारे आहोत रडणारे नाही. तुम्ही कितीही दडपशाही करा, कितीही मनगटशाही करा, पण आम्ही मागे हटणार नाही.
खराडे म्हणाले ज्या रस्त्याची कुणाचीच मागणी नाही. भाविकांनी मागणी केली नाही, शेतकऱ्यांनीही कधीच मागणी केली नाही. राज्यातील कोणत्याही वाहन धारकांचीही मागणी नाही. ज्या रस्त्याची मागणीच नाही, तो महामार्ग कशासाठी करायचा घाट घातला जात आहे. बरे आता राज्यासह देशभरात लोकसंख्या प्रचंड वाढल्याने शेतीचे क्षेत्र घटत आहे. मग या महामार्गा साठी आणखी 27हजार हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. म्हणजे शेती आणि शेतकरी उध्वस्त करण्याचे काम विकासाच्या नावाखाली सुरु आहे. जिल्ह्यातून या पूर्वी रत्नागिरी नागपूर, गुहागर विजापूर, हे महामार्ग गेलेले आहेत. याशिवाय पुणे बंगलोर ग्रीनफिल्ड हायवे होणार आहे. तसेच फलटण विजापूर हा महामार्ग प्रस्तावित आहे. म्हणजे जिल्ह्यातील सर्व शेती महामार्गा साठीच हडप केली जाणार असेल तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे शेती कुठं शिल्लक राहतेय, सर्व शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचाच हा प्रयत्न आहे. याशिवाय राज्य सरकारच्याच अर्थ खात्याने शक्तिपीट महामार्ग आर्थिक दृष्ट्या फायदेशीर नाही. राज्याच्या तिजोरीवर त्याचा भार पडणार आहे. त्या मुळे तो करू नये असा अहवाल दिला आहे. रत्नागिरी नागपूर महामार्गाचा दररोज 40 लाख टोल वसुल होणे अपेक्षित असताना 10 ते 15 लाख दररोज वसुली होत आहे. मग त्याला समांतर शक्तिपीठ महामार्ग कशासाठी? असा सवाल त्याचेच अर्थखाते विचारत आहे. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह कशासाठी आहे. ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर, खासदार आमदार यांना जगविण्यासाठी? मात्र आमच्या घरादारावर नांगर फिरवून हा महामार्ग आम्ही होऊ देणार नाही. त्यासाठी गोळ्या झेलायचीही आमची तयारी आहे. गुन्हे घाला, तुरुंगात टाका आम्ही कशालाही भीक घालणार नाही. जीवात जीव असे पर्यंत आम्ही लढू आणि जिंकू असा निर्धार खराडे यांनी व्यक्त केला.