प्रतिष्ठा न्यूज

सांगलीतील पद्मभूषण डॉ. वसंतराव पाटील शासकीय रुग्णालयासाठी १५ कोटी निधीची आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्याकडून मागणी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. ४ जुलै : सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार  सुधीरदादा गाडगीळ यांनी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन सांगली येथील पद्मभूषण डॉ. वसंतराव पाटील शासकीय रुग्णालयासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची विनंती केली.
या भेटीदरम्यान आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले, “सांगलीसह सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येतात. मात्र रुग्णालयात अद्यापही मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असून, रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.”
त्यांनी यावेळी पुढे सांगितले की, “रुग्णालय परिसरात कंपाऊंड वॉल बांधणे, सुरक्षा यंत्रणा आणि प्रवेशद्वार उभारणे, नविन निवासी सुविधा, धोंडीराज बंगल्याचा विकास, रस्त्यांचे डांबरीकरण, पार्किंगची व्यवस्था, औषध साठवणूक शेड यांसारख्या आवश्यक कामांसाठी निधीची तातडीने गरज आहे. या कामांसाठी संबंधित विभागांकडून प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्यात आले असून, आज मी मंत्रीमहोदयांकडे निधी मंजुरीची मागणी केली आहे. लवकरच निधी मंजूर होऊन रुग्णालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.”
या भेटीदरम्यान आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्यासोबत श्री. अतुल माने आदी मान्यवर उपस्थित होते.