शिवाजी विद्यापीठाची मान्यता! आनंदी फार्मसी कॉलेजला पीएच.डी. संशोधन केंद्राचा बहुमान
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संशोधनाचे नवे दालन खुले

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण फार्मसी शिक्षण देणाऱ्या आनंदी फार्मसी कॉलेज, कळंबे तर्फ कळे (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्याकडून पीएच.डी. संशोधन केंद्र म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आहे. ही मान्यता २०२५–२६ या शैक्षणिक वर्षापासून पुढील तीन वर्षांसाठी लागू राहणार आहे.
या मान्यतेनंतर आनंदी महाविद्यालयात उच्चस्तरीय संशोधन प्रयोगशाळा, संशोधनवृत्तीला पोषक वातावरण आणि विविध नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी संशोधनाचे हे सुवर्णद्वार ठरणार असून, त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीला नवसंजीवनी मिळणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश देसाई व सचिव डॉ. विद्या देसाई यांनी याबाबत सांगितले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. ही मान्यता आमच्या कार्याचा गौरव आहे.”
प्राचार्य डॉ. सुरेश किल्लेदार व उपप्राचार्य डॉ. राहुल आडनाईक यांनी शिवाजी विद्यापीठाकडून आलेल्या अधिकृत पत्राची माहिती संस्थेला दिल्यानंतर आनंदाची लाट उसळली. यानंतर संस्थेच्या वतीने अध्यक्ष व सचिवांनी सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हे महाविद्यालय गेल्या ८ वर्षांपासून ग्रामीण भागात फार्मसी शिक्षण क्षेत्रात सक्रीय असून, आता संशोधन क्षेत्रातही भरीव पाऊल टाकले आहे.
* ही मान्यता म्हणजे ग्रामीण प्रतिभेच्या उज्ज्वल भविष्यासाठीची पहिली पायरी आहे!