टिळकांचे देशभक्तीचे व तेजस्वी जीवन गौरवाने स्मरणात – डॉ.बी.एम.पाटील

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगांव : येथील संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे महिला शिक्षण शास्त्र महाविद्यालय येथे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे आयोजन प्रशिक्षणार्थीमध्ये समतेच्या मूल्यांची व देशभक्तीची प्रेरणा निर्माण व्हावी या उद्देशाने करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भित्तिपत्रिकेचे प्रकाशन मा.प्राचार्याच्या हस्ते करून करण्यात आली त्यानंतर दीपप्रज्वलन व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रशिक्षणार्थीं ललिता बामणे व मुक्ताई मिसाळ यांनी टिळकांच्या जीवनावर आपले मनोगत सादर केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम.पाटील सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,” या ठाम विचारांनी लोकमान्य टिळकांनी जनतेत स्वातंत्र्याची ज्वाला पेटवली.शिक्षण,समाजसुधारणा आणि पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी भारतीय जनतेला संघटित करण्याचे कार्य केले.भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला नवे वळण देणारे, जनतेत राष्ट्रभक्ती जागवणारे टिळक हे खरे अर्थाने “लोकमान्य” होते.ते गणित,संस्कृत,धर्मशास्त्र, खगोलशास्त्र यांचे गाढे अभ्यासक होते.स्वातंत्र्याची ज्वाला पेटवून त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती सारखे सार्वजनिक सण सुरु करून त्यांनी समाज एकत्र आणला आणि राष्ट्रीय भावना निर्माण केली.केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांमधून त्यांनी ब्रिटिश सत्तेवर जोरदार टीका केली. टिळकांनी लिहिलेले “गीता रहस्य” हे पुस्तक कर्मयोगाचे महत्त्व सांगते. आजच्या युगात टिळकांचे देशभक्तीचे व तेजस्वी जीवन गौरवाने स्मरणात ठेवण्याचे गरज आहे असे मत प्रतिपादित केले.सदर कार्यक्रमास डॉ.एल.व्ही.भंडारे,डॉ.ए.एस.चि खलीकर,डॉ.डी.टी.खजूरकर,प्रा.ए. आर.पंडित तसेच कार्यालयीन कर्मचारी संजय कुंभार,हणमंत वाघमारे,सुजाता हजारे,अस्मिता साळी हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका लोहार व वर्षाराणी कोष्टी यांनी केले.सदर कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.प्रमोद शेंडगे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार स्मिता माने यांनी केले.