चार घरफोड्या आणि चोरीचे गुन्हे उघडकीस, तिघांना अटक ;सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई

प्रतिष्ठा न्यूज/अक्षय कोठावळे
सांगली : सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून तिघांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून चार गुन्ह्यांचा उलगडा झाला असून सुमारे १.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यातील फिर्यादी प्रितम प्रभाकर हंकारे (२५, रा. कसबे डिग्रज ता. मिरज) यांच्या फिर्यादीवरून २२ जुलै २०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. अज्ञात चोरट्यांनी कसबे डिग्रज येथील हॉटेलची पत्रा उचकटून आत प्रवेश केला व मिक्सर, गॅस टाकी, ताट्या, चाटया आदी साहित्य चोरून नेले होते.
या प्रकरणी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारायकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम. यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी पथके तयार करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोहेकॉ अक्षय माने यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी गौतम राजु काळे (२०, रा. महसूल कॉलनी, सांगली) हा चोरीतील गॅस टाकी घेऊन विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक कॉलेज, इनामधामणी येथे उभा आहे.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आणि त्याच्या साथीदारांनी – दिपक राजाराम माने (१९, रा. मिरज) व एका अल्पवयीन बालकासोबत मिळून बुधगाव, तुंग, कळंबी येथे हॉटेल व घरफोड्यांच्या चोरी केल्याचे कबूल केले. त्यांनी विविध ठिकाणी गॅस टाक्या, मिक्सर, तांब्याची भांडी, दारूचे चॉक्स इत्यादी वस्तू चोरी केल्याचे उघडकीस आले.
या आरोपींविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाणे आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील एकूण चार गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून अंदाजे १.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गौतम सोनकांचाळे करत आहेत.



