प्रतिष्ठा न्यूज

तिसंगी सरपंचाच्या सतर्कतेने उघड झाली बोकड चोरीचा प्रयत्न; महिनाभरात सलग चोरीच्या घटना

प्रतिष्ठा न्यूज: तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा तालुक्यातील तिसंगी गावात सरपंचांच्या सतर्कतेमुळे बोकड चोरीचा प्रयत्न उघड झाला आहे.
फिर्यादी सर्जेराव ज्ञानू पाटील (वय ५४), विद्यमान सरपंच तिसंगी यांच्या तक्रारीनुसार, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता गगनबावडा मेन रोडवरील परशुराम चव्हाण यांच्या चहाच्या टपरी जवळ आरोपी चेतन निवृत्ती देसाई (रा. घरपण, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) व रामा विश्राम नार्वेकर (रा. शिरसिंगे, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) हे मरगुबाई मंदिराजवळ सोडलेला बोकड चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना पकडले गेले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील करीत आहेत.

सलग चोरीच्या घटना

दरम्यान, गेल्या महिनाभरात साळवण परिसरात सलग चोरीच्या घटना घडल्या आहेत.
लोंघे येथील महादेव मंदिरातील दानपेटी व मूर्ती चोरीस गेली.
मुटकेश्वर येथे चहाची टपरी फोडून गॅस सिलेंडर व भांडी चोरीस गेली.
त्याच गावात बंब चोरीस गेल्याची नोंद आहे.

पोलिसांसमोर आव्हान

गेल्या महिन्यात घडलेल्या या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सतत वाढणाऱ्या चोरीच्या घटनांनी पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, संबंधित गुन्हेगारांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.