प्रतिष्ठा न्यूज

लोकतीर्थ वर्षपूर्ती समारंभ उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज / अक्षय कोठावळे 
सांगली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री, भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती व शिक्षण सम्राट स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या संकल्पनेतून साकारलेले “लोकतीर्थ” या शिक्षणाच्या पवित्र स्थळाला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने आयोजित वर्षपूर्ती समारंभ गुरुवारी उत्साहात व भव्यदिव्य वातावरणात संपन्न झाला.

५ सप्टेंबर हा भारताचे माजी राष्ट्रपती व तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच दिवशी डॉ. कदम यांच्या स्मृतीस्थळ लोकतीर्थ च्या लोकार्पण दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला.

या समारंभास माजी विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार, आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, खासदार विशालदादा पाटील, आ. डॉ. विश्वजित कदम, माजी आमदार विक्रमदादा सावंत, डॉ. इंद्रजित बाबा मोहिते यांच्यासह कदम कुटुंबातील सदस्य, आजी-माजी पदाधिकारी व जिल्हाभरातून आलेले हजारो साहेबप्रेमी उपस्थित होते.

मान्यवरांनी या प्रसंगी डॉ. कदम यांच्या लोकाभिमुख कार्याची उजळणी करत, शिक्षण व समाजसेवेतून त्यांनी उभारलेल्या संस्थात्मक कार्याचे स्मरण केले. गरीब-गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करून देत त्यांनी निर्माण केलेले लोकतेज आजही प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी सांगितले.