प्रतिष्ठा न्यूज

एस.टी. कामगारांसाठी प्रबोधनपर विनोदी कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/अक्षय कोठावळे 
कोल्हापूर : गोकुळ शिरगांव येथील एस.टी. महामंडळ वर्कशॉपमध्ये आज दुपारी ३.३० वाजता “हसुया! पण विचारशिल जगूया!” या प्रबोधनपर विनोदी सादरीकरणाचा मनमुराद आनंद एस.टी. कामगारांनी घेतला. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कोल्हापूर अंतर्गत कामगार कल्याण केंद्र कागल यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन पुणे विभाग प्रमुख मा. मनोज पाटील व कोल्हापूरचे कामगार कल्याण अधिकारी मा. विजय शिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
प्रसिद्ध विनोदी कलावंत मा. राहुल चित्रुक यांनी आपल्या खास शैलीत हास्य टॉनिक सादर केले. त्यांच्या तुफान विनोदांनी परिसर दणाणून गेला. छोट्या छोट्या किस्स्यांमधून उलगडलेले विनोद, टाळ्यांचा कडकडाट आणि उपस्थितांचा आनंदी गजर अशा वातावरणाने कार्यक्रम रंगतदार झाला.
विनोदातून प्रबोधनाची भाषा मांडणे ही राहुल चित्रुक यांची खासियत असून, कामगार व अधिकारी वर्गाने मनसोक्त हसत हसत जीवनातील गांभीर्याचे संदेश घेतले. कामाचा ताण बाजूला सारून महिला व पुरुष कामगारांनी एकत्र बसून हा मनोरंजक कार्यक्रम उपभोगला. कलावंताचा विनोदी बाज कामगारांनी अक्षरशः डोक्यावर घेतला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!