आयकर अधिकारी असल्याचे भासवून कवठेमहांकाळ येथे फसवणूक करणाऱ्या टोळीतील आणखीन दोन आरोपींना अटक ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कारवाई

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : आयकर अधिकारी असल्याचे भासवून कवठेमहांकाळ येथे फसवणूक करणाऱ्या टोळीतील आणखीन दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी ही कारवाई केली.
आरोपीचे नाव व पत्ता
१) अक्षय सुरेश लोहार वय. ३० वर्षे रा. बुगटे अलुर ता. हुक्केरी जि. बेळगाव राज्य – कर्नाटक
२) शकील गौस पटेल वय. ४४ वर्षे रा. गडहिंग्लज जि- कोल्हापूर.
गुन्ह्याची थोडक्यात हकीकत
दि.१४.०९.२०२५ रोजी रात्री ११.०० वा. ते १२.०० वाजणेचे दरम्यान कवठेमहांकाळ येथे राहणारे फिर्यादी यांचे राहते घरी अनोळखी ३ पुरुष व १ महिला यांनी इनकम टॅक्स ऑफीस, मुंबई येथील अधिकारी असल्याचे भासवून तोतयागिरी करुन फिर्यादी यांचेकडील एकूण १,४१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व १५,६०,०००/- रुपये रोख रक्कमेची फसवणूक करुन ते घेऊन गेल्याने त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाणेस वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्हयांचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व कवठेमहांकाळ पोलीस ठाणे यांनी वेगवेगळी पथके तयार करुन गुन्हयाचा तपास करून त्यामध्ये काल दिनांक १८/०९/२०२५ रोजी तीन आरोपी यांना पुणे व कोल्हापुर जिल्हयातुन ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असुन मा. न्यायालयाने त्यांना दिनांक २४/०९/२०२५ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली आहे. आरोपीकडुन १४१ तोळे सोन्याचे दागीने व १५,०५,०००/- रोख रक्कम व गुन्हयात वापरलेले वाहन हस्तगत करण्यात आले असुन उर्वरीत परागंदा आरोपींचा पथके शोध घेत असताना आज १९/०९/२०२५ रोजी आरोपी नामे १) अक्षय सुरेश लोहार वय. ३० वर्षे रा. बुगटे अलुर ता. हुक्केरी जि. बेळगाव राज्य कर्नाटक २) शकील गौस पटेल वय. ४४ वर्षे रा. गडहिंग्लज जि- कोल्हापूर हे सांगली येथे पोलीसांसमोर स्वतः हजर झालेने सदर गुन्हयाच्या अनुशंगाने त्यांचेकडे चौकशी केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा एक महिला आणि एक अन्य साथीदारांसोबत फिर्यादी यांचे घरात जावून सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली.
लागलीच त्यांना ताब्यात घेऊन कवठेमहांकाळ पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पुढील तपास कवठेमहांकाळ पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील करीत आहेत.



