प्रतिष्ठा न्यूज

कायद्याचे पालन करा, सुरक्षितता जपा, कवठे एकंदकराना प्रशासनाचे आवाहन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : कवठे एकंद आणि नागाव कवठे येथील दसऱ्यानिमित्त होणारी ऐतिहासिक आतषबाजी सुरक्षित आणि शांततेत पार पाडण्यासाठी ग्रामस्थांनी कायद्याचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे यांनी केले आहे.प्रथा आणि परंपरांचे पालन करताना नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दसऱ्याच्या शोभेच्या आतषबाजी उत्सवाच्या निमित्ताने कवठे एकंद येथील सिद्धराज मंदिर आणि नागाव येथील श्री नागनाथ मंदिर येथे प्रशासनाने ग्रामस्थांसोबत विशेष बैठका आयोजित केल्या होत्या.यावेळी तहसीलदार अतुल पाटोळे यांनी ग्रामस्थांना आवाहन करताना सांगितले की,या ऐतिहासिक परंपरेला नवीन पिढीसमोर ठेवताना चुकीच्या पद्धतीने ते जाऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे.यासाठी गावातील प्रतिष्ठित आणि जुन्या जाणत्या लोकांना या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे.उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवड यांनी उत्सव शांततेत आणि आनंदाने योग्य ती दक्षता घेऊन साजरा करण्याचे आणि आतषबाजीसाठी रीतसर परवानगी घेण्याचे आवाहन केले.यावेळी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ म्हणाले, “गावाचा यात्रा उत्सव शांततेने व सुखरूप पार पाडणे ही पोलिसांची व ग्रामस्थांची जबाबदारी आहे.परंतु,कायद्याच्या चौकटीत राहून आतषबाजी केली जावी.आतषबाजी करणाऱ्या शोभा दारू मंडळांनी यासाठी रीतसर परवानगी घ्यावी.”
धोकादायक दारूकाम टाळण्याचे आवाहन प्रशासनाने यापूर्वीच धोकादायक दारुकाम बंद केले आहे. तरीसुद्धा,ग्रामस्थांनी व दारू शोभा मंडळांनी अजूनही जे धोकादायक दारुकाम आहे,ते कमी करावे. “प्रत्येकाने आपापल्या जीवाची जबाबदारी घेतली आणि भावनांवर आवर घालून यात्रा पार पाडली,तर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही,” अशा स्पष्ट सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या.
दिनांक 30 सप्टेंबर पासून पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच महसूल विभागाकडील मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी ग्रामसेवक पोलीस पाटील यांचे पथक तयार करण्यात आले असून ते शोभा दारू मंडळांना भेट देऊन मोठ्या प्रमाणात शिंगाडे व इतर फटाक्यांची निर्मिती होणार नाही याची दक्षता घेतील तसेच ज्या ठिकाणी सुरक्षेचे नियम पाळले जात नाहीत त्यांचे विरुद्ध उचित कारवाई करण्यात येणार आहे.तत्पूर्वी,सकाळी तहसील कार्यालय तासगाव येथे दसरा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी विविध शासकीय विभागांची बैठक घेण्यात आली.यामध्ये पोलीस विभाग,ग्राम विकास विभाग,नगरपरिषद,आरोग्य, महावितरण आणि परिवहन महामंडळ इत्यादी विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.उत्सवाच्या नियोजनासाठी विविध विभागांनी पार पाडाव्याच्या जबाबदाऱ्यांबद्दल सूचना देण्यात आल्या.या सूचनांमध्ये फायर ब्रिगेड गाडी,ॲम्बुलन्स,वैद्यकीय पथक, पुरेसा औषध साठा उपलब्ध करणे, वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे, तसेच महावितरणकडून विद्युत पुरवठ्याबाबत करावयाचे कामकाज यांचा समावेश होता.सर्व विभागांनी आपापली जबाबदारी पार पाडून उत्सव शांततेत पार पाडावा,याची दक्षता घेण्याचे सांगण्यात आले.
या बैठकांना उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवड,तहसीलदार अतुल पाटोळे,पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ,गटविकास अधिकारी अविनाश पाटील,मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी,दोन्ही गावांचे सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,यात्रा समिती सदस्य आणि शोभा दारू मंडळाचे अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button