श्रीपतराव बोंद्रे (दादा) यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर प्रतिनिधी : श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन व महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री स्व. श्रीपतराव शंकरराव बोंद्रे (दादा) यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेत विविध उपक्रमांतून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेच्या मुख्य कार्यालयासह सर्व शाखांमध्ये दादांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थेचे चेअरमन मा. मानसिंगराव बोंद्रे (दादा), गोकुळचे संचालक विश्वासराव पाटील (आबाजी), प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
संस्थेच्या श्रीपतराव शंकरराव बोंद्रे इंग्लिश मीडियम हायस्कूल, जवाहर हायस्कूल, श्री साई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय आदी शाखांमध्येही विशेष कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आयक्यूएसी व शिवाजी ग्रंथालय यांच्या वतीने “दादा आठवताना” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. डी. एल. काशीद पाटील यांनी दादांच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण होते. या वेळी दादांच्या जीवनकार्यावरील पोस्टर प्रदर्शन व ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. पी. बी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पी. के. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन शिवाजी रायजादे यांनी केले.
या उपक्रमांना प्रबंधक रवींद्र भोसले, आयक्यूएसी समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर, सहसमन्वयक डॉ. ए. बी. बलुगडे, परीक्षा विभाग प्रमुख डॉ. के. एम. देसाई, स्टाफ सेक्रेटरी डॉ. डी. के. वळवी, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सहकारी यांनी सक्रिय सहभाग दिला.
कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन श्री मानसिंगराव बोंद्रे (दादा), नूतन प्रशासकीय अधिकारी श्री मनीष भोसले व श्री विठ्ठल आंबले यांचे विशेष प्रोत्साहन लाभले.