खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं,आणि टाळ्या मिळवायच्या,*महाराष्ट्रातील संस्कृती बिघडवण्याचे काम* आमदार रोहित पाटलांचा पडळकरांना सणसणीत टोला…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यानंतर आमदार रोहित पाटील यांनी पडळकर यांच्यावर सडकून टीका करत,”महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचं काम होत असेल,तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनतेला उत्तर द्यावे लागेल,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांना इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसापासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर व माजी मंत्री जयंत पाटील यांच्यात तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या नेत्यांच्यात सातत्याने शाब्दिक वाद सुरू आहेत.त्यापुढे जाऊन पडळकर विरुद्ध आव्हाड असा मारामारीचा सामना ही महाराष्ट्राने बघितला आहे.त्यांनी अलीकडच्या काळात पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना अत्यंत खालच्या भाषेचा वापर केला,ज्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे.या टीकेनंतर सांगली जिल्ह्यातील युवा आमदार आणि दिवंगत आर.आर.पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी पडळकरांना थेट आव्हान दिले आहे.आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भूमिके विषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पाटील यांनी पडळकर यांच्या टीकेच्या पद्धतीवर सखोल नाराजी व्यक्त केली.ते म्हणाले, “सारखं कुणाला तरी खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं आणि सभेमध्ये टाळ्या मिळवायच्या.पण सभा संपली की माणसं विसरून जातात.राजकीय टीका करताना विकासाचे आणि लोकांसाठीचे मुद्दे बाजूला पडत असल्याचा मुद्दा उपस्थित करत रोहित पाटील यांनी पुढे म्हटले,”त्यातून लोकांचं पोट भरत नाही.महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचं काम त्यांच्याकडून होत असेल,ज्येष्ठांचा सन्मान राखला जात नसेल,तर हे योग्य नाही.जनतेला उत्तर द्यावे लागेल रोहित पाटील यांनी यावेळी पडळकरांना अप्रत्यक्षपणे निवडणुकीचा इशारा दिला.ज्येष्ठांचा सन्मान राखला जात नसेल,तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनतेला (पडळकर यांना) उत्तर द्यावे लागेल,असे ते म्हणाले.या वक्तव्यामुळे जयंत पाटील यांच्या समर्थकांमध्ये ऊर्जा निर्माण झाली असून,पडळकर यांच्या आक्रमक राजकारणाला आता युवा पिढीकडूनही थेट उत्तर दिले जात असल्याचे चित्र आहे.गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील राजकीय वैर जुने असले, तरी आता रोहित पाटील यांच्या एन्ट्रीमुळे हा वाद नवा आयाम घेत आहे.रोहित पाटील यांनी संस्कृती आणि ज्येष्ठ-सन्मानाचा मुद्दा उपस्थित करत,पडळकरांच्या टीकेला विरोध केला आहे.आगामी काळात पडळकर यावर काय प्रतिक्रिया देतात,याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.