अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी न करता केवळ इशारा सभा कशासाठी? आमदार रोहित पाटलांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना थेट टोला

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्याची त्यांना फुरसत नाही,पण इशारा सभा घेण्यासाठी मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे असतात,शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ते पुढे आले पाहिजेत, असा टोला आमदार रोहित पाटील यांनी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला.राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे आमदार रोहित आर.आर.पाटील यांनी आज तासगाव तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात शेतकरी, पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सध्याच्या बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्या ऐवजी सरकार केवळ विरोधी पक्षांवर टीका करण्यात व्यस्त असल्याचा आरोप आमदार रोहित पाटील यांनी यावेळी केला.ते म्हणाले सध्याच्या बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांची मदत करणे आवश्यक आहे.मात्र सरकारमधील नेते विरोधी पक्षांवर टिकास्त्र चालवण्यात व्यस्त असून जनतेच्या समस्या सोडवण्यात उदासीन आहेत.शेतकऱ्यांची पोरं उपाशी आहेत,लोक त्रस्त आहेत. सरकारने लोकहिताचे मुद्दे घेऊन उभे राहिले पाहिजे;केवळ टाळ्या मिळवण्यासाठी सभांत टिका करण्यात काहीही अर्थ नाही.या उपोषणादरम्यान शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रमुख मागण्या शासनासमोर प्रभावीपणे मांडण्यात आल्या.त्यातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणेअतिवृष्टीग्रस्त भागात सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्यावी.शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी.राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.या उपोषणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यावर तात्काळ निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.आमदार रोहित पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,जर शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले,तर पुढील काळात यापेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल.या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत तासगाव तहसीलचा परिसर दणाणून सोडला होता.



