पदोन्नती टप्पे कमी केल्याने जिल्हा परिषद लिपीकांना मिळणार पुढील पदाची वेतनश्रेणी

प्रतिष्ठा न्यूज
मुंबई प्रतिनिधी : मुंबई येथे मंत्रालयात मा.नामदार जयकुमार गोरे मंत्री ग्रामविकास यांचेकडे दि.३० सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीक वर्गीय कर्मचारी संघटनेची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
जिल्हा परिषदेच्या लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यामधील सहाय्यक प्रशासन अधिकारी आणि कनिष्ठ प्रशासन अधिकारी या दोन संवर्गांचे एकत्रीकरण करून या पदास सहाय्यक प्रशासन अधिकारी पदाची एस-१४ ही वेतनश्रेणी ठेवण्यात येणार आहे. पदोन्नती टप्पे कमी केल्यामुळे एस-१३ मधील वेतन घेत असलेल्या कर्मचाऱ्यांना एस-१४ वेतनश्रेणी मिळेल. शिवाय अश्वासित प्रगती योजनेमध्ये लिपीकांना याद्वारे पुढील संवर्गातील वेतनश्रेणी मिळेल.
जिल्हा परिषदेच्या लिपीकांचे पदोन्नतीचे टप्पे कमी करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील शिराळाचे आमदार मा. सत्यजितभाऊ देशमुख यांनी मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी निवेदन दिले होते. या निवेदनाच्या अनुषंगाने याविषयी पहिली बैठक दि.१६ जुलै रोजी संपन्न झाली होती. त्यावेळी लिपीकांचे पदोन्नती टप्पे कमी केल्यामुळे राज्याच्या तिजोरीवर किती रुपयांचा भार पडेल याविषयी माहिती सादर करण्याच्या सूचना मा. मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या होत्या. लिपीकांचे पदोन्नती टप्पे कमी केल्याने राज्याच्या तिजोरीवर नगण्य भार पडणार असल्याने सदरची फाईल वित्त विभागाकडे मंजूरीसाठी पाठविण्याचे निर्देश मा.मंत्री जयकुमार गोरे यांनी आजच्या बैठकीत दिले. या बैठकीस शिराळ्याचे मा. आमदार सत्यजितभाऊ देशमुख उपस्थित होते.
या बैठकीस ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव मा.एकनाथजी डवले साहेब यांचेसह ग्रामविकास विभागाकडील उपसचिव मा.सीमा जाधव मॅडम, मा.नितीन पवार साहेब कक्ष अधिकारी ग्रामविकास विभाग हे उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीक वर्गीय संघटनेचे राज्य अध्यक्ष सागर बाबर, राज्य कोषाध्यक्ष उमाकांत सुर्यवंशी, राज्यसरचिटणीस अरूण जोर्वेकर, राज्य उपाध्यक्ष संजय चव्हाण, सांगली जिल्हा अध्यक्ष विशाल पाटील, नाशिक जिल्हाअध्यक्ष प्रमोद निरगुडे, सांगली जिल्हा कोषाध्यक्ष महेश गावंदरे, जिल्हा सहसचिव दिलीप गारळे उपस्थित होते.