संजय काकांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष,बुधवारी होणार मोठा निर्णय..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : आगामी नगरपालिका,जिल्हा परिषद,आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.याच अनुषंगाने,माजी खासदार संजयकाका पाटील हे येत्या बुधवारी, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी तासगाव येथे त्यांच्या कार्यकर्त्यांशी ‘संवाद बैठक’ द्वारे संवाद साधणार आहेत. या बैठकीत ते पुढील काळातील आपली राजकीय भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.संजयकाका पाटील यांच्या या ‘कार्यकर्ता संवाद बैठकीचे’ आयोजन बुधवार, दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आले आहे.दुपारी २.०० वाजता ही बैठक जनाई मंगल कार्यालय,विटा रोड,तासगाव येथे होणार आहे.माजी खासदार संजयकाका पाटील यांनी तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांना योग्य दिशा देण्यासाठी तसेच त्यांची मते जाणून घेण्यासाठी या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.त्यांच्या राजकीय भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.विशेषतः जिल्हा परिषद, पंचायत समिती,महानगरपालिका, नगरपालिका,नगरपंचायत निवडणुकांमध्ये पाटील यांची भूमिका काय असणार,कोणत्या पक्षासोबत किंवा नेतृत्वाखाली ते निवडणुकीला सामोरे जाणार,याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.तासगाव आणि कवठेमहांकाळमधील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्यात संजयकाका पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणा संदर्भात मोठी आणि स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.त्यांच्या या भूमिकेचा परिणाम आगामी निवडणुकांवर आणि स्थानिक राजकारणाच्या समीकरणांवर नक्कीच होणार आहे.त्यामुळे,संजयकाका पाटील यांच्या भाषणाकडे केवळ तासगाव-कवठेमहांकाळ तालुकाच नव्हे,तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.