प्रतिष्ठा न्यूज

जागतिक टपाल दिनानिमित्त गगनबावड्यात विशेष उपक्रम मोबाईल युगातही ग्रामीण भागात ‘पोस्टमन’ ठरतो नागरिकांचा खरा मित्र

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : “आज मोबाईल आणि इंटरनेटच्या झपाट्याने वाढणाऱ्या युगातही पत्राच्या वाटेने येणारा पोस्टमन हा प्रत्येक ग्रामीण घराचा ‘आपलाच माणूस’ आहे. तो फक्त पत्र घेऊन येत नाही — तो आनंद, माहिती, शासकीय योजना, आणि कधी कधी आशेची किरणे घेऊन येतो.”

डोंगर-दऱ्यांनी वेढलेल्या गगनबावडा तालुक्यात ४६ वाड्या-वस्त्यांमध्ये विखुरलेली माणसे अजूनही टपाल सेवेशी घट्ट जोडलेली आहेत. जोरदार पाऊस, थंडी, वादळातही टपाल सेवकांचे पाऊल थांबत नाही. हातात पत्रांचा गठ्ठा आणि खांद्यावर जबाबदारीची पिशवी घेऊन ते आजही प्रत्येक दार ठोठावतात.

गगनबावडा उपटपाल कार्यालयाच्या अंतर्गत असंडोली, असळज, बोरबेट, गारीवडे, कातळी, मांडुकली, साळवण, सांगशी, शेनवडे व तिसंगी अशा १० शाखा कार्यालयांद्वारे नागरिकांना पत्रव्यवहार, पार्सल, मनीऑर्डर, पेन्शन, शासकीय अनुदान अशा सेवा सातत्याने दिल्या जातात.

मोबाईल नेटवर्कची कमतरता असलेल्या डोंगराळ भागात पोस्टमन म्हणजे बँकिंग व शासकीय सेवांचा जिवंत दुवा. “तो आल्यावर गावात हलचल होते — कोणाचं पत्र आलंय, कोणाचा पैसा आला, कोणाला सरकारी योजना मंजूर झाली,” असे नागरिक सांगतात.

आजही एखाद्या घराच्या अंगणात पोस्टमनचा आवाज ऐकला की वृद्ध आई धावत बाहेर येते,
“माझ्या मुलाचं पत्र आलं का रे?”

तो क्षण — मोबाईलच्या स्क्रीनवर नाही,
तर पोस्टाच्या पत्रातच जिवंत राहतो.

दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी जगभरात जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. १८७४ मध्ये स्वित्झर्लंडच्या बर्न येथे २२ देशांनी मिळून युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) स्थापन केली. १९६९ मध्ये टोकियो येथे ९ ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून घोषित झाला. भारताने १ जुलै १८७६ रोजी युपीयूचे सदस्यत्व मिळवले.

भारताचे टपाल नेटवर्क हे जगातील सर्वात मोठे आहे — १७७४ मध्ये कोलकात्यात पहिले पोस्ट ऑफिस सुरू झाले. १८८० मध्ये मनीऑर्डर प्रणाली, १९११ मध्ये पहिले एअरमेल उड्डाण, १९८६ मध्ये स्पीडपोस्ट सेवा सुरू झाली. तर २१ नोव्हेंबर १९४७ रोजी स्वतंत्र भारताचे पहिले टपाल तिकीट जारी झाले.

“ग्रामीण भागात पोस्टमन हे केवळ पत्र आणणारे नसून ते नागरिकांना बँकिंग व शासकीय सेवा घरपोच पोहोचवतात. त्यामुळे टपाल सेवकांचा सहभाग हा खऱ्या अर्थाने सामाजिक सेवेचा भाग आहे.”
— विवेक खळदकर, सब पोस्ट मास्तर, गगनबावडा

“सांगशी–सैतवडे परिसरात आठ वाड्या पाच किलोमीटर अंतरावर विखुरलेल्या आहेत. रस्ते दुर्गम असले तरी पत्र, पार्सल आणि शासकीय सेवा वेळेत पोहोचवणे ही आमची जबाबदारी आहे. टपाल सेवा ग्रामीण लोकांशी भावनिक नाते जोडते.”
— महिला पोस्टमास्तर, सांगशी / सैतवडे

“पोस्ट सेवेत पत्रे व पार्सल वेळेवर मिळावीत, डिजिटल सेवा गावोगावी पोहोचाव्यात, तसेच वृद्धांसाठी घरपोच सेवा मिळावी,” अशी अपेक्षा आहे.
— केशव पडवळ, अति ज्येष्ठ नागरिक