पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिरजेत अनर्थ टळला; पोलिसांवर दगडफेक, लाठीहल्ला; पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी घेतली बैठक

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिरजेत अनर्थ टळला आहे . दोन गटांतील वादाला हिंदू मुस्लिम वादाचा रंग देण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी लाठीहल्ला करून जमावं पांगवला. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितला घटनाक्रम सांगितला.
मिरज शास्त्री चौक परिसरात दोन गटांतील भांडणामुळे तणाव निर्माण झाला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केल्याने पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी जमली होती. मंगळवारी रात्री शास्त्री चौकात एका तरुणाने शिवीगाळ केल्याच्या कारणावरून वाद पेटला. यामुळे मोठा जमाव जमला. संबंधित तरुणाच्या घरावर जमाव चाल करून गेला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याने शास्त्री चौकात पोलिसांवर दगडफेकीचा प्रकार घडला. यानंतर तरुणांचा जमाव पोलिसांसमोर आला. पोलिस ठाण्याकडे जाताना शास्त्री चौक, हायस्कूल रस्ता व मार्केट परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली. दंगा झाल्याची अफवा पसरल्याने पूर्ण शहर बंद झाले. रस्त्यावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली. अपमानास्पद शिवीगाळ करणाऱ्या संबंधित तरुणावर कारवाईसाठी पोलिस ठाण्यासमोर जमाव आक्रमक झाला होता. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने मिरजेत भेट दिली.मुख्यालयातील मोठा पोलिस फोर्स मिरजेत तैनात करण्यात आला. पोलिसांनी तरुणावर कारवाईचे आश्वासन देत तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत शहरात तणावाचे वातावरण होते.
डिजिटल फलक फाडलाजमावाने शास्त्री चौकात संशयित तरुणाचे छायाचित्र असलेला डिजिटल फलक फाडून नासधूस केली. पोलिसांची जादा कुमक आल्यानंतराही काही काळ जमाव चौकात होता. मात्र, पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळली.
पोलिसांकडून गुन्हा दाखलपोलिसांनी रात्री उशिरा एका तरुणावर गुन्हा दाखल केला. पोलिसप्रमुखांनी या प्रकरणी चौकशीचे व कारवाईचे आश्वासन दिले. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत मिरजेतील प्रमुख चौकांमध्ये बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
याबाबत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी विशेष स्पष्टीकरण दिले आहे. तसेच बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले आहे.
मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ०७.१०.२०२५ रोजी शास्त्री चौकातील वसंतदादा पाटील शाळेच्या समोर हिंदु धर्माच्या एका इसमाने मुस्लीम धर्माच्या मुलांना शिवीगाळ करून वादावादी केली होती. त्यामुळे त्याठिकाणी हिंदु व मुस्लीम समाजाचे लोक समोरासमोर आले होते.
हिंदु धर्मिय इसमाने मुस्लीम धर्मीय इसमास अपशब्द वापरल्याने मुस्लीम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याने मिरज शास्त्री चौकात हिंदु तसेच मुस्लीम समाजाचे दोन्ही गट एकमेकांचे समोर आले होते. १०० ते १५० अनोळखी लोक एकत्र येवून बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी करत, गोंधळ घालू लागले.
उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग व पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस ठाणे यांनी जमलेल्या जमवास शांतता राखण्याचे आवाहन करुन पोलीस ठाणेस तक्रार देणेबाबत सुचना केल्या. तरी परंतु प्रशासन कारवाई करणार नाही, असा गैरसमज करुन शास्त्री हुल्लडबाजी केली. त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये याकरीता उपलब्ध पोलीस बळाचा वापर करुन जमाव पांगविण्यात आला.
सदर इसमाचे विरोधात गुन्हा दाखल करावा आणि त्यास आमचे ताबेत द्यावे अशी मागणी जमलेला जमाव करु लागला. सदर घटना समजल्यानंतर आम्ही स्वतः तसेच श्रीमती कल्पना बारवकर अपर पोलीस अधीक्षक सांगली असे मिरज शहर पोलीस ठाणे येथे गेलो असता जमलेल्या जमावास शांतता राखण्याचे व अफवावर विश्वास न ठेवण्याचे, तसेच आरोपीविरूध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन केलेनंतर जमाव शांततेत निघुन गेला.
सदरवेळी जमावाकडून अनुचित प्रकार घडू नये याकरीता १ पोलीस अधीक्षक, १ अपर पोलीस अधीक्षक, २ उपविभागीय अधिकारी, ७ पोलीस निरीक्षक, १६ सपोनि/पोऊनि, २ दंगल नियंत्रण पथक, १ स्ट्रायकींग, ४०० पोलीस अंमलदार असा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला होता.
परिस्थितीचे गांभिर्य पाहुन दंगल नियंत्रण पथक तसेच मिरज उपविभागातील पोलीस अधिकारी व पोलीस स्टाफ हा जादा बंदोबस्त उपलब्ध झाल्याने मिरज शहरातील महत्वाच्या ठिकाणी बाजारपेठ, प्रमुख चौक, लोकवस्तीचे ठिकाणी तसेच धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे या ठिकाणी फिक्स पाँईट तसेच गस्त नेमण्यात आली.
सदर घटनेच्या अनुषंगाने दि.०८.१०.२०२५ रोजी १२.०० ते ०२.०० वा. पोलीस अधीक्षक कार्यालय, विश्रामबाग सांगली येथे आमदार श्री सुरेश भाऊ खाडे, आमदार श्री इद्रिस नायकवडी, उपजिल्हाधिकारी महसुल प्रसानाकडील अधिकारी तसेच सांगली, मिरज पोलीस उपविभागातील शांतता समिती, प्रतिष्ठीत नागरिक, समाजसेवक यांची बैठक घेवून त्यांना शांतता राखण्याचे व अफवावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सांगली जिल्हा पोलीस दलाकडून सोशल मिडीयावर बारकाईने लक्ष पुरविण्यात येत असून आक्षेपार्ह पोस्ट, फोटो, व्हीडीओ न पाठवू नये व त्याला प्रतिसाद देवू नये अन्यथा संबधीतांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.




