पाऊस ओसरला… पण जखमा कायम! गगनबावड्यात ₹२९.२४ लाखांचे नुकसान, ३६ घरांची पडझड
कुंभी व कोदे प्रकल्प परिसरात तब्बल ६,००० मि.मी.हून अधिक पाऊस

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आता पावसाने ओढ घेतली असली तरी त्याच्या जखमा मात्र अद्यापही कायम आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा ताजा अहवाल तहसील कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला असून, त्यानुसार तालुक्यातील ३६ घरांची पडझड झाली असून खाजगी मालमत्तेचे एकूण नुकसान रुपये २९.२४ लाख इतके झाल्याची नोंद महसूल विभागाने केली आहे.
तहसीलदार कार्यालयाच्या अहवालानुसार, पूर्णपणे कोसळलेले घर – १, तर आंशिक पडझड झालेली घरे – ३६ आहेत. याशिवाय ११ बाह्य गोट्यांचे नुकसान झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतरही या नुकसानग्रस्तांना अद्याप शासकीय मदत मिळालेली नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.
दरम्यान, तालुक्यातील पावसाची आकडेवारीही लक्षवेधी आहे.
कुंभी मध्यम प्रकल्पावर ऑक्टोबर अखेरपर्यंत ६,६७३ मि.मी. पाऊस तर कोदे लघु प्रकल्पावर ६,५३४ मि.मी. पाऊस नोंदवला गेला आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक राहिले आहे.
वर्ष कुंभी प्रकल्प (मि.मी.) कोदे प्रकल्प (मि.मी.)
२०२१ ७६५२ ६५१०
२०२२ ७०४६ ६४०६
२०२३ ५०४७ ५६३४
२०२४ ५९१८ ७१८९
२०२५* ६६७३ ६५३४
(*२०२५ चे आकडे १३ ऑक्टोबरपर्यंतचे आहेत)
सततच्या पावसामुळे भूस्खलन, घरांची पडझड आणि शेतीतील हानीमुळे नागरिकांचे आर्थिक संकट वाढले आहे. अनेक ठिकाणी पिके वाहून गेली असून रस्ते, वीजपुरवठा व वाहतूक व्यवस्थेवर ताण आला आहे.
आता आकाश निरभ्र झाले असले तरी, नुकसानग्रस्तांना शासकीय मदतीची प्रतीक्षा कायम आहे. तहसील प्रशासनाकडून मदत वाटपाची प्रक्रिया लवकर सुरू होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.



