कोल्हापूर रोडवरील खोकीधारकांचे पुनर्वसन प्रलंबित — प्रशासनाच्या उदासीनतेविरुद्ध आमरण उपोषण

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली -मिरज- कुपवाड महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आजपासून सुरू झालेल्या खोकीधारकांच्या आमरण उपोषणाने स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कोल्हापूर रोडवरील अधिकृत खोकीधारकांचे पुनर्वसन गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, वारंवार आश्वासने देऊनही ठोस कारवाई होत नसल्याने शेवटी खोकीधारकांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष गणेश कोहेते करत असून, उपाध्यक्ष प्रवीण कांबळे, निशांत कुरणे, किसन जाधव यांच्यासह सर्व खोकीधारक व त्यांचे कुटुंबीय आंदोलनात सहभागी झाले आहेत. प्रशासन आणि स्थानिक जनप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून खोकी काढून टाकल्यानंतर आता त्याच लोकांना व्यवसाय आणि उपजीविकेच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.
खोकीधारकांनी स्मरण करून दिले आहे की, २० जानेवारी २००७ रोजीच्या महासभा ठराव क्र.१६७ नुसार आर.सी.सी. गटारीवर गाळे बांधण्याचा निर्णय झाला होता. २२ जानेवारी २००८ रोजी प्रत्येकी रु. ३७,५००/- इतकी रक्कम काही खोकीधारकांनी महानगरपालिकेत जमा करून प्रशासनावर विश्वास दाखवला होता. परंतु आजतागायत त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही.
“आमचा व्यवसायच आमचा श्वास आहे. प्रशासनाने दिलेलं आश्वासन पूर्ण करावं, अन्यथा आम्ही उपोषण मागे घेणार नाही,” असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
या आंदोलनाला वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन संघटनेचा जाहीर पाठिंबा मिळाला असून, संजय कांबळे, प्रशांत वाघमारे, जगदीश कांबळे, संजय भुपाल कांबळे कार्यकर्ते उपोषण स्थळी उपस्थित होते.
दरम्यान, उपोषणामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. सणासुदीच्या काळात रोजगार आणि उपजीविका गमावलेल्या खोकीधारकांच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खोकीधारकांचा मुद्दा केवळ पुनर्वसनाचा नाही, तर प्रशासनाच्या आश्वासनांच्या विश्वासार्हतेचा आहे. गरिबांच्या उदरनिर्वाहाशी निगडित या प्रश्नात संवेदनशीलता आणि तत्परता दाखवणे हीच खरी शासनव्यवस्थेची कसोटी ठरणार आहे.



