शांतिनिकेतनचे नृत्य दिग्दर्शक महेश पाटील यांचे निधन; उद्या खंडेराजुरी येथे रक्षा विसर्जन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : शांतिनिकेतन येथील हरहुन्नरी कलावंत नृत्य दिग्दर्शक महेश पाटील यांचे सोमवार दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झाले. त्यांच्याच मूळ गावी म्हणजेच खंडेराजुरी येथे त्यांचे अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले. रक्षाविसर्जन बुधवार दि. २२ रोजी सकाळी ८:३० वाजता खंडेराजुरी येथे होईल.
८ जून १९७६ ला एका मिल्ट्रीतील कॅप्टनच्या पोटी, खंडेराजुरी या गावात जन्मलेल्या श्री महेंद्र नानासो पाटील उर्फ महेश पाटील यांना सुरुवातीपासूनच क्रिकेट आणि डान्सची प्रचंड आवड होती. पैकी क्रिकेट हा छंद आणि डान्स हे करिअर अशी निवड करत त्यांनी 2005 साली शांतिनिकेतन मध्ये प्रवेश केला.
विविध शाळा, महाविद्यालये तसेच विद्यापीठातील युथ फेस्टिवल सारख्या दर्जेदार सांस्कृतिक स्पर्धेमध्ये मागील वीस वर्षांपासून त्यांनी प्रचंड लौकिकता प्राप्त केली व त्यांना राष्ट्रीय नृत्य दिग्दर्शक म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांची काहीतरी नवीन करण्याची जिद्द आणि नृत्य क्षेत्रातील कुशलता बघता शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचे सर्वेसर्वा संचालक श्री गौतम पाटील यांनी त्यांना शांतिनिकेतन सांस्कृतिक विभागाची जबाबदारी सोपवली.
नवभारत शिक्षण मंडळ अंतर्गत असणाऱ्या विविध शाखांच्या सांस्कृतिक उपक्रमांची कामे पाहता त्यांनी लोकरंगभूमी या संस्थेअंतर्गत १२० कलाकारांचा “मुलुख मराठी”, “वाडीवरल्या वाटा” आणि “किलबिल” इंडिया अशा भव्य मनोरंजनात्मक कलाविष्कारांच्या संयोजनाची व नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी देखील यशस्वीरित्या हाताळली. त्यांनी 35 पेक्षा जास्त मराठी अल्बम आठ ते दहा मराठी चित्रपटात देखील नृत्य दिग्दर्शनाचं काम केलेलं आहे.
त्यांच्या दिग्दर्शनांतर्गत शांतिनिकेतन येथे असणाऱ्या लेफ्ट. जनरल एस. पी. पी. थोरात अकॅडमी या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर देखील नृत्य क्षेत्रात अनेक पारितोषिके प्राप्त केलीत. हे करत असताना MSPD सारख्या उन्हाळी शिबिरातील सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर शांतिनिकेतनच्या स्टाफ डेव्हलपमेंट अकॅडमी अंतर्गत असणारे वर्षभरातील विविध कार्यक्रम याची धुरा देखील मा. संचालक श्री गौतम पाटील यांनी श्री महेश पाटील सर यांच्या हाती दिली.