प्रतिष्ठा न्यूज

पोलीस मुख्यालय, सांगली येथे पोलीस स्मृती दिन परेड २०२५ संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : दि. २१.१०.२०२५ रोजी पोलीस मुख्यालय सांगली येथील शहिद स्मारक येथे पोलीस स्मृतीदिन परेड संपन्न झाली. दिनांक २१ ऑक्टोबर १९५९ या दिवशी लडाख येथे हॉट स्त्रींग या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील १० शूर शिपायांच्या तुकडीवर चिनी लष्कराच्या सैन्याने पूर्व तयारीनिशी हल्ला केला. त्या १० शुर वीरांनी शत्रुशी निकराची लढत देऊन देशासाठी आपले देह धारातिर्थी ठेवले. तेव्हा पासून २१ ऑक्टोबर हा दिवस देशातील सर्व पोलीस दलाचे वतीने पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो.

पोलीस स्मृती दिनाचे दिवशी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाचे ठिकाणी १ सप्टेंबर ते ३१ ऑगस्ट या एका वर्षाचे कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना आपले कर्तव्य बजावत असताना वीर मरण आले त्या सर्वाना आदरांजली वाहन्यात येते. दिनांक १ सप्टेंबर २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत देशातील सर्व राज्यातून एकूण १९१ पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपले कर्तव्य बजावत असताना देह धारातिर्थी ठेवले. त्या सर्व शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. सदर परेडचे नेतृत्व श्री बाळू तात्या आलदर राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय सांगली यांनी केले. सदर परेडमध्ये ३० पोलीस अंमलदारांचे सशस्त्र पथक सहभागी झाले होते. सदर पथकाने परेडच्या वेळी हवेमध्ये बंदुकिच्या फैरी झाडून शहिदांना मानवंदना दिली त्यावेळी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गणवेशावर पोलीस ध्वजदिवसाचे स्टीकर लावले होते.

सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. संदिप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली हे उपस्थित होते. तसेच श्री प्रणील गिल्डा, उप-विभागिय पोलीस अधिकारी मिरज विभाग, श्री संजय मोरे, पोलीस उप-अधीक्षक, मुख्यालय हे उपस्थित होते. तसेच सदर कार्यक्रमासाठी अन्य पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन स्टाफ हजर होते. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन सेवानिवृत्त पोलीस उप निरीक्षक बाळासाहेब माळी यांनी केले. सदर कार्यक्रमामध्ये शहिदांच्या नावाचे वाचन श्री दिपक भांडवलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा व श्री कुमार पाटील पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी केले.