बँकेत दावा न केलेली रक्कम खातेदारांना देण्यासाठी शुक्रवारी महामेळावा; अग्रणी प्रबंधक विश्वास वेताळ! “माझा पैसा माझा अधिकार” – खातेदारांनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्याची अग्रणी बँक असणारी बँक ऑफ इंडियाच्या वतीने जिल्ह्यातील विविध बँकांच्या माध्यमातून बँकेमध्ये दावा न केलेल्या १७६ कोटी रुपये असणाऱ्या ७,७५,३१५ खातेदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी स्व. वसंतदादा पाटील सभागृह, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सांगली येथे दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता महामेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या महामेळाव्यामध्ये ज्या लोकांच्या ठेवी बँकेमध्ये दावा न करता पडून आहेत अशा सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी प्रबंधक विश्वास वेताळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
वित्तीय सेवा विभाग वित्त मंत्रालय केंद्र सरकार यांच्या उपक्रमानुसार जिल्हा अग्रणी कार्यालय (बँक ऑफ इंडिया) सांगली यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या मेळाव्यास राज्यस्तरीय बँकर्स समितीचे प्रतिनिधी, रिझर्व्ह बँक अधिकारी, विविध विमा कंपन्याचे प्रतिनिधी तसेच सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे खातेदाराने बचत, चालू व मुदत ठेव अशा स्वरूपातील १० वर्षांत खात्यावर कुठलाही व्यवहार केला नसेल तर ती रक्कम संबंधित बँकेने रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) जमा करावी लागते, अशी रक्कम मागणी करण्याचा अधिकार खातेदार किंवा मयत खातेदाराच्या वारसाला आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने खातेदारांना संबंधित बँकेशी संपर्क करून आपली रक्कम मागणी करण्यास तीन महिन्यांचा अवधी दिला आहे. तरी सर्व बँकेमध्ये दावा न केलेल्या खातेदारांनी आपले बँकखाते पुस्तक, आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रासहित स्व. वसंतदादा पाटील सभाग्गृह सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सांगली येथे उपस्थित राहून या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहनही श्री. वेताळ यांनी केले आहे.