प्रतिष्ठा न्यूज

उद्योजकता परिचय मेळाव्यासाठी मंगळवारी युवकांना उपस्थित राहाण्याचे आवाहन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 31 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे आणि उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यातील अनुसूचित प्रवर्गातील युवक युवतींना आणि महिलांना दर्जेदार मोफत उद्योजकता विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यासाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी सविस्तर माहिती व निवड प्रक्रियेसाठी दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता उद्योग भवन, विश्रामबाग सांगली येथे मोफत उद्योजकता परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त युवकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन एम.सी.ई.डी. प्रकल्प अधिकारी किरण बनसोडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
जिल्ह्यातील बार्टी स्थापित स्वयंमसहाय्यता गटातील अनुसूचित जातीमधील युवक युवती यांच्यासाठी एक महिना कालावधीचा मोफत अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम दि. 6 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणात विविध उद्योग संधी, वित्त व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया, विपणन आणि ग्राहक सेवा, यशस्वी उद्योजक होण्यासाठी मार्गदर्शन, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, बाजारपेठ पाहणी व व्यवस्थापन, प्रकल्प आहवाल कसा तयार करावा, उद्योगांना भेटी यासह उद्योग उभारणीसाठीच्या विविध विषयांचा समावेश असेल. यामुळे जिल्ह्यातील अनुसूचित जातीमधील युवक व युवतींना मोफत दर्जेदार प्रशिक्षण मिळणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थींना विविध महामंडळाच्या योजना आणि इतर सरकारी योजनांचा लाभ देऊन पुढे एक ते दोन वर्ष एम.सी.ई.डी. मार्फत उद्योग उभारणीसाठी मोफत पाठपुरावा होणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.