कुपवाड शहर शिवसेना अध्यक्षपदी विजयराव गडदे

प्रतिष्ठा न्यूज
कुपवाड प्रतिनिधी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कुपवाड शहरप्रमुख पदाची जबाबदारी विजयराव गडदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. गडदे यांच्या निवडीने कुपवाड शहरात शिवसेनेला अधिक बळकटी मिळेल, अशी भावना शहरातील शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.
विजयराव गडदे यांची अनेक वर्षापासून उबाठा गटाचे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून ओळख आहे.
सुरुवातीपासूनच त्यांनी पक्षनिष्ठेने कार्य केले. पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणावर चालत त्यांनी कुपवाड परिसरातील सामाजिक कार्याची भक्कम पायाभरणी केली. समाजसेवेतील त्यांची तळमळ आणि पक्षनिष्ठा लक्षात घेऊन शिवसेना उबाठा गटाने त्यांची शहरप्रमुखपदी नियुक्ती केली आहे.
यावेळी नियुक्तीबद्दल विजय गडदे म्हणाले, पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्यास निश्चितपणे पात्र ठरेन. आगामी निवडणूक काळात कार्याचा परिणाम जनतेला दिसून येईल. स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण मी नेहमीच जपेन. समाजकारणावर भर देत, जनतेच्या प्रश्नांवर तोडगा काढणे हेच माझे प्रमुख ध्येय असेल. यापुढील काळात कुपवाड शहरात शिवसेना भक्कम करू, असा विश्वास विजयराव गडदे यांनी व्यक्त केला.




