एस.सी.जातीच्या दाखल्याची जाचक अट रद्द करा – दलित महासंघाचे आयुक्तांना निवेदन…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : अनुसूचित जाती व जमातीमधील समाविष्ट जातीच्या नागरिकांना जातीचा दाखला काढण्यासाठी असणारी 1949 पूर्वीचा दाखल्याची व महसूली पुराव्याची जाचक अट रद्द करावी.त्यास पर्यायी कागदपत्रे घ्यावीत,अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दलित महासंघ (मोहिते गट) राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार व मागासवर्गीय आयोगाला निवेदनाद्वारे दिला आहे.विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय विभागाने दि.26 सप्टेंबर 2008 मध्ये जाहीर केलेल्या परिपत्रकात अनुसूचित जाती,विमुक्त जाती,भटक्या जमाती,इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाची यादी जाहीर केली आहे.यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या 13 टक्के आरक्षणामध्ये (एस.सी) 59 जातींचा समावेश आहे.
59 जातीमध्ये 1949 पूर्वी शिक्षणाचा अभाव होता.तत्कालीन जातीव्यवस्था व वर्णव्यवस्थेने या जमातींना शिक्षण व मालमत्ता जमविण्यापासून वंचित ठेवले होते.परिणामी अनुसूचित जमातीमधिल नागरिकांकडे 1949 पूर्वीचा शाळेचा दाखला किंवा महसुली पुरावा उपलब्ध नाही.याबाबतच्या कोणत्याही प्रकारच्या नोंदी शासकीय कार्यालयात उपलब्ध नाहीत.परिणामी पहिल्या पिढीत शिक्षण घेणाऱ्या मुलांना जातीचा दाखला काढताना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.अनुसूचित जाती व अनुसूचित जातीचा (एस.सी) दाखला काढण्यासाठी प्रशासनाने लागू केलेल्या अटीमध्ये अर्जदार अर्जासोबत वडिलांच्या रक्ताच्या नात्यातील 1949 पूर्वीचा वडील,चुलता,चुलत आजोबा,पणजोबा,आत्या,चुलत चुलते,यांचा शाळेचा,जन्म नोंद दाखला तसेच जमिनीचा महसूली पुरावा आवश्यक मानला आहे.परंतु हे जुने पुरावे उपलब्ध नाहीत.एस.सी.जमातीच्या युवकांना जातीच्या दाखल्या अभावी शैक्षणिक शिष्यवृत्ती,परदेशी शिष्यवृत्ती,कॉलेज प्रवेश,शासकीय योजना यांचा लाभ मिळत नाही.मूळ कागदपत्रे अभावी जातपडताळणी होत नाही.त्यामुळे एस.सी.आरक्षणाच्या लाभापासून विद्यार्थी व समाज वंचीत राहत आहे.तेंव्हा एस.सी.प्रवर्गामध्ये समाविष्ट 59 जातींना लागू असणारी 1949 पूर्वीचा पुरावा दाखल्याची जाचक अट रद्द करावी.तसेच मागासवर्गीय आयोगाने पर्यायी मार्ग काढून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी व समाजाला न्याय द्यावा.अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशांत केदार यांनी निवेदनात दिला आहे.निवेदनावर,युनूस कोल्हापूरे,विजयाताई माळी,शोभाताई सालपे,प्रमिला गावडे,निशांत आवळेकर,अंकुश केंगार,अक्षय दोडमणी,अजित कांबळे,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.