प्रतिष्ठा न्यूज

तासगावात गुन्हे प्रकटीकरन शाखा जोमात,डोंगरसोनीचा तस्कर जेरबंद,खरसुंडीचा एकजण फरार

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तालुक्यातील आरवडे – तासगाव रोडवर गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या डोंगरसोनी येथील सचिन आप्पासो निकम (वय 30) याला जेरबंद करण्यात आले.तर त्याचा साथीदार आप्पासो जाधव (रा. खरसुंडी, ता. आटपाडी) हा फरार झाला आहे.अटक केलेल्या सचिन निकम याच्याकडून चार चाकी गाडी व 4 किलो 305 ग्रॅम गांजा असा सुमारे 9 लाख 8 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली.तासगाव शहरासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी गांजाची तस्करी सुरू आहे.अनेक ठिकाणांवरून तासगाव तालुक्यात गांजा विक्रीसाठी आणला जातो.गावागावात गांजा विक्रीचे लोन पसरले आहे.त्यामुळे तरुण पिढी गांजाच्या आहारी जात आहे.त्यातून गुन्हेगारीही वाढत आहे.त्यामुळे गांजा तस्करांची पाळेमुळे खणून काढा,असे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले आहेतत्यानुसार तासगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी गांजाची तस्करी रोखण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करीत असतात.या शाखेतील प्रशांत चव्हाण,विठ्ठल सानप व विवेक यादव यांना गोपनीय बातमीदारामार्फत आरवडे – तासगाव रस्त्यावर एकजण गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरुदेव काबुगडे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने या मार्गावर सापळा रचला.त्याचवेळी सचिन निकम हा आपल्या चार चाकी गाडीतून गांजा विक्रीसाठी या रस्त्यावर थांबल्याचे निदर्शनास आले.यावेळी गाडीची तपासणी केली असता गाडीत 4 किलो 305 ग्रॅम गांजा आढळून आला.हा गांजा कोणाकडून आणला याची चौकशी केली असता तो खरसुंडी येथील आप्पासो जाधव यांच्याकडून आणल्याची कबुली सचिन निकम यांनी दिली.याप्रकरणी सचिन निकम याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 4 किलो 305 ग्रॅम गांजा व चार चाकी गाडी असा सुमारे 9 लाख 8 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या गांजाची पुरवठा करणारा आप्पा जाधव फरार आहे.त्याचा शोध पोलीस घेत आहेत.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे करीत आहेत.ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक भवड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरुदेव काबुगडे यांच्यासह अभिजीत गायकवाड,अमित परीट,अमर सूर्यवंशी,प्रशांत चव्हाण विठ्ठल सानप,विवेक यादव यांच्या पथकाने केली.
चौकट…
*प्रशांत चव्हाण, विठ्ठल सानप, विवेक यादव यांची उल्लेखनीय कामगिरी..!
तासगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे आजपर्यंत उल्लेखनीय काम आहे. अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास या पथकाने केला आहे. शिवाय तालुक्यातील अवैध व्यावसायिकांचे कंबरडे मोडण्यासाठी या पथकातील कर्मचारी कार्यरत असतात. याच पथकातील प्रशांत चव्हाण, विठ्ठल सानप, विवेक यादव यांनी आरवडे तासगाव रोडवर होणारी गांजा तस्करी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले. गोपनीय बातमीदारमार्फत त्यांना या तस्करीची माहिती मिळाल्याने सचिन निकम या गांजा तस्करांच्या मुसक्या आवळता आल्या.