शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेतील खेळाडुंनी देशाचे नाव उंचावावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील ; राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 3 : राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी राज्यभरातून विद्यार्थिनी खेळाडु, पंच आले आहेत. खेळाडुंनी संघभावना ठेवत जिद्दीने उत्कृष्ट कामगिरी करावी. महिला क्रिकेट विश्वचषकातील खेळाडुंच्या पावलावर पाऊल ठेवून जगभरात देशाचे व महाराष्ट्राचे नाव उंचावावे, अशा शुभेच्छा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्या.
राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी दूरदृष्यप्रणालीद्वारे ते बोलत होते. श्रीमती चंपाबेन वालचंद शाह महिला महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, माजी तालुका क्रीडा अधिकारी उमेश बडवे, महाविद्यालयाचे रितेश शेठ, प्रकाश शाह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 19 वर्षाआतील मुली या वयोगटासाठी ही स्पर्धा होत असून ती 4 तारखेपर्यंत चालणार आहे.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिला क्रिकेट विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय महिला संघाचा व त्यात सहभागी असलेल्या सांगलीची क्रिकेटपटू स्मृती मानधनाचे विशेष अभिनंदन केले. तसेच, राज्यभरातून आलेल्या खेळाडुंना महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. क्रीडा स्पर्धेच्या चांगल्या आयोजनासाठी त्यांनी संयोजकांचेही कौतुक केले.
खासदार विशाल पाटील यांनी खेळाडुंनी संघभावनेने खेळून स्पर्धेचा आनंद लुटावा. यश अपयशाच्या पलिकडे जावून स्पर्धेत खिला़डु वृत्तीने सहभागी व्हावे व यशस्वी कामगिरी करावी, अशा शब्दात खेळाडुंना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेच्या निमित्ताने चांगले वातावरण जिल्ह्यामध्ये तयार झाले आहे. कमी कालावधीत उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल क्रीडा विभागाचे कौतुक करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, क्रीडा स्पर्धेतील सहभागामुळे पाच टक्के आरक्षण मिळते. हे खरे असले तरी क्रीडांगणावर आपण घडतो. त्यामुळे खेळाची मजा घेण्यासाठी स्पर्धा असते. याच पद्धतीने स्पर्धेला सामोरे जा. हीच क्रीडा संस्कृती आहे. स्पर्धा करा, पण, संकटावेळी हात दिला तर तोच खरा यशस्वी खेळाडु होतो. भविष्यासाठी तयार व्हा, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी श्रिया घोटसकर (पुणे) व मनवा पाटील (इस्लामपूर) या भारताचे प्रतिनिधीत्व केलेल्या खेळाडुंचा सत्कार करण्यात आला. यावेळी एम. टी. देसाई, तालुका क्रीडा अधिकारी विकास माने, क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे, आरती हळिंगळी यांच्यासह राज्यभरातून आलेल्या खेळाडु उपस्थित होत्या. यावेळी खेळाडुंना शपथ देण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते मैदानपूजनाने स्पर्धेची सुरवात करण्यात आली.
स्वागत व प्रास्ताविक उपसंचालक सुहास पाटील यांनी केले. जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. सुहास व्हटकर यांनी केले. स्पर्धेसाठी दीपक राऊत यांनी मैदान तयार केले. जिल्हा अधिकारी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
क्रीडा स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंच मोहसिन बागवान (पुणे) हे पंचप्रमुख आहेत. तर राज्य पंच रोहित झुरांगे (पुणे) तसेच, प्रवीण मोरबाळे, इब्राहिम शेख, रोहित ढेरे आणि अमोल पालकर (सर्व कोल्हापूर) हे पंच म्हणून काम पाहणार आहेत. निवड समिती सदस्य म्हणून तालुका क्रीडा अधिकारी, वर्धा जमीर अत्तार, आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू व शासकीय व्हॉलीबॉल कोच प्रज्ञा वरेकर, संघटना प्रतिनिधी धनंजय वनमाळी, कांतिभाई वामजा हे आहेत.



